गोष्ट आहे गेल्या आठवडय़ातली. माझ्याबरोबर अनेक वर्षे काम करणाऱ्या माझ्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांची मावशी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे निमित्त झाले आणि एक-दोन दिवस घरातच खुरडत काढल्यावर वेदनेने घरच्यांना के. ई. एम.चा आधार घ्यायला भाग पाडले. लीलावेली अम्मा के. ई. एम.मध्ये दाखल झाल्या. एक्स-रेमध्ये खुब्याचे हाड मोडल्याचे निदान झाले. धातूचा सांधा बसविण्याची शस्त्रक्रिया ठरली. पण आमच्या मनात धाकधूक. कारण लीलावेली अम्मांचे वय ८६ च्या पुढे. शरीर गलितगात्र. कुठे मेदाचा अंश नाही. हात लावू तेथे फक्त हाडे आणि सुरकुतलेली कातडी. लीलावेली अम्मांना मी भेटायला गेलो. माझी अटकळ होती- एक चिडलेली, चरफडणारी, करवादणारी, देवाचा धावा करणारी किंवा त्याला बोल लावणारी आणि ‘सोडव रे आता’ म्हणून साद घालणारी म्हातारी पाहावी लागणार. पण लीलावेली अम्माने माझे हसत, तोंडभरून स्वागत केले. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्यांना ‘जाळं’ म्हणण्याची चूक मी करणार नाही. विधात्याने त्यांना वयपरत्वे दिलेला तो नजराणा होता; ती त्याची कशिदाकारी होती. लीलावेली अम्मांच्या तोंडात दात नव्हते. पण हसरं आणि निरागस बोळकं म्हणजे काय, याचा तो प्रत्यक्ष साक्षात्कार होता. आपला सांधा मोडलाय, याचे त्यांना वैषम्य नव्हते. वेदनेची तक्रारही नव्हती. उलट, मी काय करतो, माझ्या कामाचे स्वरूप इतर डॉक्टरांपेक्षा वेगळे कसे आहे, हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.
शस्त्रक्रियेच्या आदल्या संध्याकाळी रक्तगट तपासणीसाठी नमुना गोळा करताना मला चार ठिकाणी टोचावे लागले. माझे मन मलाच खंतावू लागले. पण लीलावेली अम्माने हू की चू केले नाही. शस्त्रक्रियेत पूर्ण भूल द्यावी लागली. सांधा बसला. तिसऱ्या दिवशी अम्मा आधाराने उभी राहिली आणि पाचव्या दिवशी घरी जाण्याची वाट पाहू लागली. या संपूर्ण काळात मी तिला फक्त हसतानाच पाहिले. शुश्रूषेला येणाऱ्या रेसिडेंट डॉक्टर व नर्सेसनी, जेवणखाण केले का, याची ती विचारपूस करायची. मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाषेची अडचण येईल, असा माझा कयास होता. कारण लीलावेली अम्माचे कसदार केरळी मल्याळम् मला अवगत नव्हते. मी इंग्रजीत माझ्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांना म्हणालो, ”will you please translate what I say?” तडफदार अभिमानित लीलावेली अम्मा उद्गारली, ”I Know English, I can speak. …100%.” साक्षरतेची मिरासदारी मिरवणाऱ्या केरळच्या जनशिक्षण योजनांचा मला लख्खकन् परिचय झाला. मग मी लीलावेली अम्माशी थेट बोलू लागलो. ती हॉस्पिटलमध्ये असताना तिला मुद्दामहून जाऊन भेटण्याचा मला लळा लागला.
माझ्या अवतीभवती तर अनेक वृद्धजन होते; पण असे काय होते लीलावेली अम्मात- जे तिच्या अस्तित्वाची भुरळ इतरांवर घालत होते, याचा मी शोध घेऊ लागलो. लीलावेली अम्मा एक शानदार वृद्धत्व जगत होती. Growing old gracefully- हे मी अनेकदा वाचले होते; पण आज मी ते अनुभवले होते.
जे टाळता येणार नाही, ज्याच्या प्राप्तीसाठी व्यक्तीला कोणतेही कष्ट वा विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत; ज्याला शस्त्रक्रिया परतवू शकणार नाही; ज्याला औषधांच्या मात्रा लगाम घालू शकणार नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे- वृद्धत्व. ते गौतम बुद्धाला चुकले नाही, महात्मा गांधींना चुकले नाही, की मदर तेरेसाला चुकले नाही. त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच, की आपण जरत्वाशी समझोता करतो; त्यांनी त्याचे स्वागत केले. या व्यक्ती पिकल्या, पण वठल्या नाहीत. उलट, जीवनप्रेरणा त्यांच्यात खोलवर मुरल्या. ही वृत्ती आशकपणा आणि आसक्तीची नव्हती, तर कृतर्थता आणि भक्तीची होती. आयुष्य खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे तर मागे वळून पाहावे लागते हे खरे; पण मागे वळून पाहायचे असेल तर पुढे जात राहावेच लागते, हेही खरे.
माशुक का बुढापा लज्जत दिला रहा है;
अंगूर का मज़ा किशमिश में आ रहा है।
असे म्हणून जगजीतसिंग खटय़ाळपणे बुढाप्याचे वर्णन करतात आणि त्याची लज्जत चाखण्याची सूचना देतात. खरे तर जसजशा तुमच्या हृदयाच्या धमन्या कडक होऊ लागतात, तसतसे तुमचे मन मऊ होऊ लागतं. पण मऊपणा म्हणजे दौर्बल्य नव्हे, तर ती इतरांना समजून घेण्याची वृद्धिंगत झालेली सहनशीलता आणि सहिष्णुता होय. मी मुद्दामहून ‘सोशिकपणा’ हा शब्द टाळतो आहे. कारण ‘सोसण्यात’ एक प्रकारची व्यथा दडलेली आहे, तर ‘साहण्यात’ एक आगळा आनंदानुभव आहे. Art of living is nothing else, but learning how to grow old gracefully! तेव्हा आलेल्या वृद्धत्वाबद्दल तक्रार न
को; गेलेल्या दिवसांबद्दल खंत नको. ‘आमच्या काळात असे होते,’ याचा नगारा नको. ‘माझे कोणी काही ऐकतेय का?’ असा धोशा नको. आपण फक्त प्रसन्नतेने येणारे वृद्धत्व स्वीकारायला शिकू या. कारण या तक्रारी, ही खंत या फक्त आपल्या मनातल्या गोष्टी असतात. आणि आपण जर मनावर घ्यायचे नाही, असा निग्रह केला तर मग कोणतीही गोष्ट शल्य म्हणून मनाला टोचत नाही. मग शेजारचे पाटील आजोबा सचिन आणि रैनाची फटकेबाजी बघताना सी. के. नायडूंमधून बाहेर येतात.. बेगम अख्तरची सुरावट खुलविण्याची ताकद कार्तिकी गायकवाडमध्ये त्यांना जाणवते.. आणि स्वत:ची लॅम्ब्रेटा इतिहासजमा झाली तरी बिट्टूची FZ-16 ‘किती मायलेज देते?’ याचे त्यांना औत्सुक्य असते. आपण जसजसे वाढतो, तसतशी सुंदरता आपल्या आत खोलवर रुजायला.. भिनायला हवी, हेच खरे!
..उद्या लीलावेली अम्मा घरी जाणार म्हणून मी तिला भेटायला गेलो. तिने मला आग्रहाने घरी जेवायला बोलावले. मला आवडणारी अविअलची भाजी करण्याचा बेत ठरला. लीलावेली अम्मा उद्गारली, ”I will cook; cooking is my hobby.” मल्याळी प्रथेनुसार ‘शेरी’ म्हणून मी तिचा निरोप घेतला. ऑफिसच्या वाटेत आमच्या इमर्जन्सी वॉर्डात डोकावलो. तेवीस वर्षांचा एक युवक अपघातात सापडून अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाला होता. जगण्याची शक्यता कमी होती. डॉक्टरांना योग्य त्या सूचना देऊन मी ऑफिसात परतलो. खुर्चीवर बसताना मनात विचार आला..
Do not resent growing old,
many are denied that privilege.
डॉ. संजय ओक
sanjayoak@kem.edu
साभार- लोकसत्ता
Recent Comments