पर्यावरणरक्षणासाठी खारीचा वाटा. . . .

1 Sep
2010

ढासळते पर्यावरण सावरण्याची इच्छा असणारी मनं आणि प्रयत्न करणारे हात यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही खूप प्रेरणादायी बाब आहे. ‘द ग्रीन पॅट्रीऑट वर्किंग ग्रुप’ ही लॉस एंजेलिस इथे कार्यरत असलेली संख्या अशा प्रयत्नवादींपैकीच एक. पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे त्यांनी प्रसिद्ध केलेले ‘५० सिंपल स्टेप्स टू सेव्ह द अर्थ फ्रॉम ग्लोबल वॉर्मिग’ हे पुस्तक. ‘हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं आमच्यात खूप सकारात्मक बदल झाले आणि हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांच्याही मनात खूप बदल होतील’ अशी या संस्थेला खात्री वाटते.
अशी खात्री बाळगायला हरकत नाही, अशी आजची परिस्थिती नक्कीच आहे. कारण प्रत्येक माणसानं पर्यावरणरक्षणात अगदी खारीचा वाटा उचलला तरी परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल. त्यासाठी त्याला खूप मोठे प्रयत्न करण्याचीही गरज नाही. अगदी साध्या साध्या प्रयत्नातूनही हे करता येईल. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते दृष्टीकोन बदलण्याची, सवयी बदलण्याची. ‘चलता है’ ही वृत्ती सोडून देण्याची. ‘दुनिया इधर की उधर हो जाये, मला काय त्याचं!’ ही आत्मकेंद्रीतता त्यागण्याची. स्वत:त असे बदल जाणीवपूर्वक घडवून आणले तर पर्यावरणाचा प्रश्न सुटला नाही तरी चिघळणार तरी नाही. ही पायरी गाठली की, हळूहळू प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही.
मग असे कोणते बदल सामान्य माणसानं अंगिकारायला हवेत? खरं तर हे बदल वारंवार समाजासमोर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण अजून समाजसुधारणा होत नसेल, जनता त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या गोष्टी पुन्हा पुन्हा समाजासमोर ठेवाव्या लागतात. झोपी गेलेल्याला जागं होईपर्यंत गदागदा हलवत राहावं लागतं, तशातलाच हा प्रकार आहे. त्यासाठी थोडय़ाथोडक्या नाही तर ५० टीप्स या पुस्तकात एकत्रितपणे वाचायला मिळतात. यात जुन्या टीप्स आहेत, तशा काही नव्याही आहेत. या टीप्स समाजानं का पाळाव्यात, त्याचा काय फायदा होईल, याचीही सविस्तरपणे माहिती दिली आहे.
कार्बन डाय ऑक्साईड हा पर्यावरणाचा शत्रू नंबर वन. साहजिकच टीप्सची सुरुवात होते ती ‘डिटरमाईन युवर कार्बन फूटप्रिंट’ या लेखानं. कार्बन फूट प्रिंट म्हणजे दिवसाला आपण कार्बन डाय ऑक्साईड किती मार्गानी वातावरणात सोडतो, याचं मोजमाप. वाहनं, एसी, इलेक्ट्रीकल अप्लायन्सेस यांचा वापर ही काही मुख्य कारणं. इतर कारणं अनेक. हा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर टाकणं आणि त्यायोगे समतोल राखणं, हे झाडांचं काम. त्यामुळे परिसंस्थेत वृक्षांचं स्थान महत्त्वाचं असूनही मानवानं झाडांवर बेलगामपणे कुऱ्हाड चालवून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. व्यक्तिगत कार्बन एमिशन काऊंट मोजण्यासाठी www.safeclimate.net  किंवा www.carbonfund.org यासारख्या साईट्सचा उपयोग करता येईल आणि त्याप्रमाणे उपाय करता येतील.
यासाठीसुचवलेल्या अनेक उपायातला एक अगदी साधा उपाय म्हणजे तुमच्या वाहनाच्या चाकातील दाब तपासून घ्या. अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशनच्या निरीक्षणानुसार रस्त्यावर धावणाऱ्या ८० टक्के वाहनांमधील एक किंवा अधिक चाकांमधील दाब कमी असतो. त्यामुळे त्यांना जास्त शक्ती आणि पर्यायानं जास्त इंधन लागते. घरातले बल्ब बदलणे हाही एक अगदी साधा उपाय. आतापर्यंत वापरत होतो, त्या बल्बपेक्षा सीएफएल (कॉम्पक्ट फ्ल्यूरोसंट लाइटस्) वापरावे याचा आज सगळीकडेच जोरदार प्रसार केला जात आहे. घरातून बाहेर पडतांना किंवा खोलीत कुणी नसताना दिवे बंद करा, हेही वारंवार सांगितलं जातंय, त्याचप्रमाणे शक्य असेल तिथं नैसर्गिक उजेडाचा वापर केल्यास, तेही अधिक संयुक्तिक ठरेल.
मांसाहाराचा आणि पर्यावरणाचाही संबंध असतो, याबाबतीत आजही अनभिज्ञता आहे. ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये कार्बन डाय ऑक्साईड नंबर एकवर आहे तर मिथेन दुसऱ्या नंबरवर आहे. ‘डाएट फॉर अ न्यू अमेरिका’ या पुस्तकाचा लेखक जॉन रॉबिन्सच्या मते ५० टक्के मिथेन मानवी कृत्यांमुळे निर्माण होतो आणि त्यापैकी ३७ टक्के पशुसंवर्धनामुळे निर्माण होतो. मांसाहारींचे प्रमाण वाढत गेल्यामुळे मिथेनची पातळीही वेगाने वाढते आहे. साहजिकच शाकाहारी व्हा, असा संदेश न देता, मांसाहाराला आठवडय़ातून एक दिवस तरी फाटा द्या, असं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. गाडीलाही कधी तरी विश्रांती द्या. आठवडय़ातून एक दिवस गाडी बाहेर न काढता चालत जा किंवा सायकल वापरा. सायकली तर आता गरीब लोकांचंच वाहन झालं आहे. पूर्वी विद्यार्थीवर्ग फार मोठय़ा प्रमाणावर सायकलींचा वापर करत असे. पण आजकाल हा वर्ग सायकलींपेक्षा स्कूटर, बाईक्सना प्राधान्य देतो. त्यामुळे वाहत्या रस्त्यांवर गाडय़ा आणि टू व्हीलर्सचा नुसता सावळा गोंधळ असतो. याचा परिणाम पर्यावरणावर खूप मोठय़ा प्रमाणावर झाला. त्यामुळेच एक दिवस तरी इंधनावर चालणाऱ्या वाहनांना आराम देण्याची सूचना या पुस्तकात करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं माणसाच्याच हातात आहे.
असाच आणखी एक निर्णय माणूस अंमलात आणू शकतो तो म्हणजे गरम पाण्याचा कमी वापर करणे. पाणी तापवणाऱ्या गिझर किंवा वॉटर हीटरमुळे कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढते. त्यामुळे रोज जे गार पाण्यानं आंघोळ करतात, त्यांचा प्रश्नच नाही. पण ज्यांना रोज जमत नाही, त्यांनी निदान आठवडय़ातून एकदा-दोनदा तरी गार पाण्यानं आंघोळ करून पाणी गरम करणे टाळले पाहिजे.
हे आणि असे अगदी सोपे-सोपे ५० उपाय या पुस्तकात दिले आहेत. सध्या वेगवेगळ्या ‘डेज’ची फॅशन आहे. सारी डे, रोझ डे, मदर्स डे, फादर्स डे अशा काहीच साध्य न करणाऱ्या ‘डेज’पेक्षा काही तरी उद्देशाने हे ‘डेज’ पाळले गेले, तर ते अधिक संयुक्तिक होईल. त्यामुळे ज्यानं त्यानं आपापल्या परीनं, आपापल्या सोयीनं ‘नो हॉट वॉटर डे’, ‘नो कार डे’, ‘नो नॉनव्हेज डे’, ‘नो एसी डे’ असे वेगवेगळे ‘डेज’ पाळावेत आणि पर्यावरणाची ऱ्हास टाळण्याचा आणि हानी भरून काढण्याचा प्रयत्न करावा, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.
५० सिंपल स्टेप्स टू सेव्ह द अर्थ
फ्रॉम ग्लोबल वॉर्मिग.
द ग्रीन पॅट्रीसॉट वर्किंग ग्रुप
जयको पब्लिशिंग हाऊस.
पृष्ठे : १६४, मूल्य : २५० रुपये

साभार लोकसत्ता.

http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=86446:2010-07-16-15-05-32&catid=34:2009-07-09-02-04-26&Itemid=11


Comment Form

top