हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांमधून प्रवास करताना एक वाक्य नजरेस पडले.. हिमालय की गागर में, विद्युत का सागर! हे वाक्य वाचल्यानंतर सुरुवातीला त्याचा बोध झाला नाही, पण त्यानंतर अवघ्या काही तासांनी ‘टिहरी’ या बहुचर्चित धरण प्रकल्पाला भेट दिल्यावर त्याची खरोखर प्रचिती आली. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि गंगा पृथ्वीवर अवतरली. पण ही गंगा तिच्या रौद्ररुपात आली तर पृथ्वीचा विनाश होईल. पृथ्वीवरील जीवसृष्टी होत्याची नव्हती होऊन जाईल हे भगवान शंकरांनी जाणले आणि गंगेला आपल्या जटेत जखडून ठेवले. गंगेची एक धारा आपल्या जटेतून शंकरांनी पृथ्वीवर सोडली अशी आख्यायिका सांगितली जाते.
गंगेला वर्षांतून दोनवेळा पूर येतो. पावसाळ्यात आणि हिमालयाचे बर्फ वितळल्यावर उन्हाळयात. गंगेच्या महापुराला जखडून ठेवण्याच्ंो काम मानवी कल्पनेच्या आवाक्याबाहेरचे आहे. पण भारतीय अभियंत्यांनी त्यांच्या अनोख्या अभियांत्रिकी कौशल्याचा आविष्कार दाखविला आणि गंगेची उपनदी असलेल्या भागीरथी नदीवर बांध घातला. हा बांध म्हणजेच टिहरी जलविद्युत प्रकल्प! महाकाय, अजस्त्र आणि कल्पनातीत. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याची जगभराने दखल घ्यावी अशीच ही धरणाची रचना. टिहरी प्रकल्पाचाच एक भाग असलेले कोटेश्वर धरण म्हणजे सिमेंट काँक्रिटमध्ये घडवलेले आधुनिक शिल्पच. भारतीयांची मान अभिमानाने उंचवावी अशीच ही कलाकृती.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील धरणे ही आधुनिक मंदिरे असल्याचे म्हटले होते. टिहरी प्रकल्प पाहिल्यावर त्यांच्या या दूरदृष्टीची कल्पना येते. टिहरी जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाला खरेतर १९७२ मध्येच मंजुरी मिळाली. पण प्रकल्पाच्या उभारणीला १९७८ मध्ये खऱ्याअर्थाने सुरुवात झाली. पण हा प्रकल्प पूर्ण होण्यास तब्बल २६ वर्षांचा काळ लोटावा लागला. या प्रकल्पाचा मोठा अडथळा ठरला तो धरणग्रस्तांनी उभारलेला लढा. धरणग्रस्तांचे नेते
सुंदरलाल बहुगुणा यांनी ‘चिपको’ आंदोलनाच्या माध्यमातून या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. धरणग्रस्तांनी अविरतपणे केलेला विरोधही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. ‘धरणग्रस्तांच्या अश्रूंवर बांधलेला प्रकल्प’ अशा शब्दांत बहुगुणा यांनी आपल्या रोषाला वाट करून दिली आहे. आजच्या स्थितीत हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे आणि धरणग्रस्तांचा विरोधही मावळला आहे. टिहरी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. येत्या वर्षभरात कोटेश्वर प्रकल्पातून चारशे मेगावॉट वीजनिर्मिती होईल. पुढच्या टप्प्यात ‘पंप स्टोअरेज प्लँट’मधून एक हजार मेगावॉट वीज गढवालच्या दऱ्याखोऱ्यातून उत्तराखंड, उत्तर प्रदेश व दिल्लीत पोहोचेल. धरणग्रस्तांचे पुनर्वसन हा सर्वात मोठा प्रश्न उत्तर प्रदेश (सध्याचे उत्तराखंड) सरकारपुढे होता. या प्रकल्पामुळे टिहरी शहरासह चाळीस गावे पूर्णत: व ७२ गावे अंशत: बुडित क्षेत्रात आली. या गावांतील सुमारे ५ हजार २०० हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. एक लाख नागरिकांवर विस्थापनाची वेळ आली. पण आज ‘न्यू टिहरी’ ही संपूर्ण पुनर्वसित वसाहत पाहिली तर धरणग्रस्तांचा प्रश्न सुटला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याचा अर्थ धरणग्रस्तांचे सर्वच प्रश्न निकाली लागले असे म्हणता येणार नाही. पण टिहरी प्रकल्पात घरटी माणसांना काम, उद्योगाला संधी आणि मुख्य म्हणजे तब्बल २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन व्यवस्था हे लाभही दुर्लक्षून चालणार नाही. शिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश व दिल्लीला पिण्यासाठी हमखास पाणी हा फायदाही लक्षात घ्यावा लागेल.
टिहरीचा जन्मच मुळात वादातून झाला आहे. एवढय़ा अजस्त्र धरणाची गरज काय ते विस्थापितांची संख्या यावरून धरणग्रस्तांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था-संघटनांनी विरोधाचे अस्त्र परजले. ही विरोधाची धार तब्बल सव्वीस वर्षे कायम होती. अखेर अडथळे पार करीत सन २००६ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित झाला. अडीचशे मेगावॉटची चार जनित्रे वीजनिर्मिती करू लागली. पण त्यासाठी अभियंत्यांना आपले अभियांत्रिकी कौशल्य पणाला
लावावे लागले. दोन डोंगरांच्या अरुंद खोबणीत हे धरण बांधण्यात आले आहे. धरणासाठी अतिशय उत्तम अशी ही साईट. हिमाचलच्या या पर्वत रांगांचा दगड अतिशय ठिसूळ (अनस्टेबल रॉक). त्यामुळे डेहराडून आणि मसुरीला वास्तव्य करणारे ब्रिटिशही या ठिकाणी धरण बांधण्यास धजावले नसावेत. मात्र ही किमया भारतीय अभियंत्यांनी केली आहे. ‘रॉक फिल डॅम’ पद्धतीचे हे धरण आहे. (धरणाच्या दोन्ही बाजूंना दगडांचा भराव आणि मध्यभागी काळी माती) या धरणाची उंची २६० मीटर म्हणजे तब्बल ८५५ फूट आहे. जगातील सर्वात उंच धरणांमध्ये टिहरीचा समावेश होतो. धरणाच्या भिंतीलगतच्या डोंगरातूनच दोन बोगद्यांद्वारे पाणी वीजनिर्मितीसाठी नेण्यात आले आहे. या बोगद्यातून साडेआठशे फूट खाली आलेल्या पाण्यावर अडीचशे मेगावॉट क्षमतेची चार जनित्रे चालविली जातात. तसेच डोंगराखाली काही मजले वीजगृह बांधण्यात आले आहे. या विद्युतगृहातून निर्माण झालेली वीज राष्ट्रीय वाहिनीला जोडली जाते. धरणग्रस्तांबरोबरच टिहरी धरणाला हिमालयातील साधू-संतांनीही जोरदार विरोध केला होता. गंगेचे पाणी वीजनिर्मिती करणाऱ्या टर्बाईनमधून आल्यावर शुद्ध राहात नाही असा आक्षेप त्यांनी घेतला. गंगेचे पाणी थेट नदीत यायला हवे असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यासाठी धरणातून एक स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी थेट सांडव्याखालच्या बाजूस (अवजल धारा) सोडण्यात आले. त्यानंतर साधू-संत-महंत मंडळींचा विरोध मावळला. हे पाणी आणण्यासाठी मात्र कोटय़वधी रुपये खर्च करावा लागला.
महाराष्ट्रातील १०५ अब्ज घनफूट जलसंचय क्षमता असलेल्या कोयना धरणातून १ हजार ९५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी खोदण्यात आलेले बोगदे, लेक टॅपिंगचा प्रयोग हे सुद्धा प्रगत झालेल्या अभियांत्रिकीचे द्योतक आहे. लेक टॅपिंगचा प्रयोग तर कोयनेत देशात प्रथमच करण्यात आला.
पण कमी पाण्यात अधिक वीजनिर्मिती करण्याचे मानक टिहरी प्रकल्पाने दिले आहेत. टिहरी प्रकल्पाचाच एक भाग असलेल्या कोटेश्वर धरणात फक्त तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठणार आहे. (खडकवासला धरणाएवढा पाणीसाठा) पण या धरणातून वीजनिर्मिती होणार आहे ती तब्बल चारशे मेगावॉट. पुण्यातील ब्रिटिशकालीन खडकवासला धरणातून तेवढय़ाच पाण्यावर फक्त दोन मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प अजून उभारणीच्या टप्प्यातच आहे तर भाटघर धरणात २३ टीएमसी पाणीसाठा होतो आणि वीजनिर्मिती होते केवळ १६ मेगावॉट. यावरून टिहरी प्रकल्पाच्या भव्यतेचा अंदाज येऊ शकतो. अधिक उंचीवरून प्रवाही पद्धतीने पाणी आणल्यास अशा प्रकारे वीजनिर्मिती शक्य होऊ शकते. कोटेश्वर जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाचे काम येत्या वर्षभरात पूर्णत्वाला जाणार आहे. या धरणाची उंची आहे ९७ मीटर म्हणजे साधारणत: २९१ फूट आहे. ही उंची सुद्धा असाधारणच आहे. या धरणासाठी बसविण्यात येणारे दरवाजेही आशिया खंडात सर्वात मोठे असणार आहेत. धरणाच्या कामासाठी खास अमेरिकेहून महाकाय क्रेन आणण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सुरुवातीचा अंदाजित खर्च तेराशे कोटी रुपयांचा आहे. कोटेश्वर प्रकल्पाचे काम म्हणजे मोठे दिव्यच आहे. ‘अनस्टेबल रॉक’ असलेल्या डोंगरांच्या दरीत हे धरण बांधले जात आहे. कोणत्याही क्षणी धरणावर दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळेच आजूबाजूच्या डोंगराला सिमेंटने बंदिस्त करण्यात येत आहे. डोंगरात साठणारे पाणी विशिष्ट पद्धतीने बाहेर पडेल याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून दरडी कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला आहे. धरणा लगतच्या डोंगरांना केलेले सिमेंटचे ‘पिचिंग’ पाहिल्यास या कामाच्या भव्यतेची कल्पना येते. धरणांना आधुनिक मंदिरे व शिल्पांची दिलेली उपमा किती सार्थ आहे हे त्यांच्या लाभावरून दिसते. केवळ विरोधाला विरोध करण्याचा सूर काढूनही उपयोग नाही. शेवटी विकासाच्या वाटा या कोणाच्या तरी बलिदानातून आणि त्यागातून जात असतात. परंतु त्याचा दूरगामी विचार केला तर भावी पिढय़ा सुखी आणि समृद्ध जीवन जगतील यात शंका नाही. अर्थात कोणाचेही बलिदान व त्यागाचे योग्य मूल्य दिले तर अशा विकासाला विरोध होणार नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.
धनंजय जाधव
साभार लोकसत्ता.
Recent Comments