महाराष्ट्रातील नद्यां होणार स्वच्छ… ३० प्रदूषित नद्यांसाठी कृती कार्यक्रम. 

26 Aug
2010

राज्यातील भीमा, गोदावरी, कृष्णा अशा प्रमुख ३० नद्यांचे पाणी प्रदूषित असून या नद्या स्वच्छ करण्यासाठी राज्य सरकारने कृती कार्यक्रम आखला आहे. यात भीमा नदीचे प्रदूषण दूर करण्याचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे.

कारखान्यामधून सोडले जाणारे दूषित पाणी, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातून बाहेर टाकले जाणारे सांडपाणी यामुळे राज्यातील ३० नद्या प्रदूषित झाल्या आहेत. देशातील अनेक प्रमुख नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या असून त्या नद्याचे प्रदूषण नष्ट करण्यासाठी केंद सरकारच्या राज्य सरकारच्या मदतीने कृती कार्यक्रम आखला आहे.

यात राज्यातील प्रमुख नद्यांचे पाणी स्वच्छ करण्यासंदर्भात मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. नद्यांचे प्रदूषण नष्ट करण्यासाठी केंद सरकार ७५ टक्के तर राज्य सरकार २५ टक्के निधी देणार आहे. वर्षभरात हा कृती कार्यक्रम राबवायचा असून या कार्यक्रमांची सुरुवात भीमा नदीपासून करण्यात येणार आहे.

नद्या स्वच्छ करतानाच भविष्यात या नद्या प्रदूषित होणार नाहीत, यासाठी संबंधित महापालिका, नगरपालिका यांच्यावर कायदेशीर बंधन घालण्यात येणार आहेत. तसेच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील दूषित पाणी नदीत सोडणारे कारखाने यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी दिले आहेत.



साभार- महाराष्ट्र टाइम्स

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429175.cms


Comment Form

top