पाणी जपून वापरणेच हिताचे !

पाणी टंचाई

पाणी टंचाई

तलावांमधील गढूळ पाणी शुद्धीकरण केंद्रांतून शुद्ध होऊन आपल्या घरी पोहोचल्यानंतर ते कसे वापरायचे हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. सामाजिक भान राखून प्रत्येकाने काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीतही पाण्याचा जपून वापर करण्याकडे लोकांचा कल दिसून येत नाही. पाणी जपून वापरले नाही तर भविष्यात मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. अशा वेळी मुंबई

महानगरपालिकाही हतबल होईल. तलावांमध्येच पाणी नसेल तर पालिका मुंबईकरांना पाणीपुरवठा कुठून करेल. त्यामुळे नागरिकांनीच आता सजग होऊन ‘पाणी बचती’चा मूलमंत्र अवलंबायला हवा.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई झपाटय़ाने विस्तारत गेली. दिवसागणिक मुंबईच्या लोकसंख्येने कोटय़वधीचा आकडा पार केला. त्याबरोबर पाण्याची गरजह वाढत गेली. मात्र उपलब्ध जलसाठय़ांचा विस्तार मात्र पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झाला नाही. आजघडीला मुंबईकरांची पाण्याची तहान भागविण्यासाठी प्रतिदिनी ४३०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रतिदिनी ३४०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पाऊस कमी पडल्यामुळे मुंबईवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. महापालिकेतर्फे मुंबईला प्रतिदिनी २९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही पाणी चोरी आणि गळतीमुळे मुंबईकरांपर्यंत प्रतिदिनी २९०० दशलक्ष लिटर पाणी पोहोचतच नाही. त्यापैकी शेकडो दशलक्ष लिटर पाणी वाटेतच वाया जाते किंवा त्याची चोरी केली जाते.
महानगरपालिका मुंबईकरांना प्रतिदिनी प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी उपलब्ध करते. मात्र सध्या पाणीटंचाई असल्यामुळे प्रतिदिनी प्रतिमाणशी ९० लिटर पाणी पुरविले जात आहे. तर यापुढे मुंबई शहरात उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतींना प्रतिदिनी प्रतिमाणशी ४५ लिटर पाणी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच नव्या इमारतींमध्ये बोअरवेल, तसेच रेनवॉटर हार्वेस्टसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. जेणेकरून नव्या इमारतींना पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल.

महानगरपालिकेतर्फे मुंबईतील जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरगुती वापरासाठी २ रुपये २५ पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणी उपलब्ध करते.

पाणी वाचवा !

पाणी वाचवा !

तर मुंबापुरीतील सोसायटय़ांना ३ रुपये ५० पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणी पुरवले जाते. तलावातील पाणी शुद्ध करून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेला प्रतिहजार लिटरसाठी  ७ रुपये ८० पैसे इतका खर्च येतो. मात्र खर्चाच्या तुलनेत पालिका मुंबईकरांना अतिशय कमी दरात पाणी उपलब्ध करते. साडेतीन रुपये प्रतिहजार लिटर दराने पालिका पाणी देते. म्हणजेत पालिकेकडून मिळणाऱ्या एक लिटर पाण्याचा दर

अतिशय नाममात्र होते. पण बाजारात ब्रॅण्डेड कंपन्यांची एक लिटर पाण्याची बाटली मुंबईकर १२ रुपये दराने खरेदी करतात. १२ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केलेले पाणी मुंबईकर प्रवासात जपून वापरत असले तरी नाममात्र दराने पालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याची नासाडी करताना दिसतात. हे चित्र आता बदलायची वेळ आली आहे. सध्या पाणीटंचाई आहे म्हणून नव्हे, तर एकूणच पाण्याचे महत्त्व ओळखून ते जपून वापरणे गरजेचे आहे.
पाणीटंचाई असल्यामुळे सध्या महापालिका बोअरवेल खणण्यास परवानगी देत आहे. परंतु मोठय़ा प्रमाणावर बोअरवेल खोदले गेल्यास भूगर्भातील जलसाठय़ावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भूगर्भातील गोडे पाणी बोअरवेलच्या माध्यमातून काढल्यास ती जागा समुद्राचे खारे पाणी घेईल. असे झाले तर मुंबईकरांना गोडय़ा पाण्यासाठी वणवण करावी लागेल. त्यामुळे आता महानगरपालिका रेनवॉटर हार्वेस्टचे महत्त्वही मुंबईकरांना पटवून देऊ लागली आहे. पावसाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टद्वारे जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरविले, तर भूगर्भातील जलसाठय़ांचे जतन होण्यास मदत होईल.
दरम्यान, यंदा पाऊस कमी पडला म्हणून तो दरवर्षीच कमी पडेल असे नाही. पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यावर तलाव भरभरून वाहतील आणि पाणीटंचाईचे संकट दूर होईल. मात्र पाणीटंचाईचे संकट दूर झाले तरी मुंबईकरांनी भविष्यात पाणी जपूनच वापरायला हवे.

प्रसाद रावकर

prasad.raokar@expressindia.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साभार – लोकसत्ता.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *