अलिबागचे उदाहरण पाहून आजच्या परिस्थितीत सरकार, नगरपालिका, नागरिक आणि पत्रकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे घडू शकते यावर विश्वास बसणार नाही, पण हे घडलंय आणि त्याची यशोगाथा राज्यात अन्यत्र अनुकरणीय अशीच आहे. अलिबागचे एक नागरिक सरकारी सेवेत ‘जिल्हाधिकारी’ या पदावर कार्यरत होते, त्यांचे नाव डॉ. निपुण विनायक. याच अलिबाग शहरातील एक उत्साही तरुण आणि प्रयोगशील उद्योजक नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि या उभयतांच्या सातत्याने संपर्क येणारे अलिबागमधील नागरिक आणि सामाजिक मनाचे पत्रकार यांचे शहरातील कचरा निर्मूलनाबाबत एकमत झाले. हे एकमत होण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक नमूद करावा लागेल तो म्हणजे जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष आणि पत्रकार हे तीनही समाजघटक समवयस्क आणि ‘पर्यावरण रक्षण’ या मुद्याशी एका भूमिकेचे होते.
नगरपालिका सभागृहात डॉ. निपुण विनायक यांनी जिल्हाधिकारी म्हणून कायदेशीर नव्हे तर ‘अलिबागचा मीसुद्धा एक नागरिक’ म्हणून एक बैठक बोलावली. नगरसेवक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सेवाभावी नागरिक आणि पत्रकार या साऱ्यांची एक दिवसाची कार्यशाळा झाली. निर्णय काहीच करायचा नव्हता, फक्त मनमोकळी चर्चा करायची होती, परंतु सामाजिक जबाबदारीची कायद्याने नव्हे तर स्नेहाने सर्वाना जाणीव करून देण्याच्या कौशल्याने डॉ. निपुण विनायक यांनी कार्यशाळेच्या अखेरीस अनाहूत यश मिळविले. ‘आमच्या शहरातील कचऱ्याचे आम्हीच निर्माते असल्याने, तो कमी करून संपूर्ण बंद करण्याची जबाबदारी आमचीच आहे,’ ही भूमिका कार्यशाळेच्या अखेरीस सर्व उपस्थितांनी मान्य करून कचरा निर्मूलनाच्या कामात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात शहरातील सर्व पत्रकारही सहभागी होते. परिणामी, या निर्णयास प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सर्व वृत्तपत्र आणि वाहिन्यांवर अलिबाग शहर स्वच्छतेचा एकच विचार वाचायला, ऐकायला आणि पाहायला मिळतोय, याचे सर्व नागरिकांनाच मोठे आश्चर्य वाटले आणि अल्पकाळात नागरिक ‘कचरा निर्मूलनाची जबाबदारी आमचीच’ याच्याशी जोडले गेले.
त्यातच एका भल्या सकाळी एक धक्कादायक चित्र शहरातील, कचरा ओसंडून पसरलेल्या कचराकुंडीजवळ नागरिकांना पाहायला मिळाले. अत्यंत दरुगधी, नको नको त्या गोष्टी असलेला कचरा, रात्रीच्या जेवणात उरलेला भात, मासळीचे, कोंबडीचे अवयव अशा साऱ्या कचऱ्याच्या डोंगराजवळ जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कचरा निर्मूलन मोहिमेतील स्वेच्छा कार्यकर्ते आणि पत्रकार उभे होते. त्या प्रभागातील नगरसेवकांनी या कचराकुंडीजवळ राहणाऱ्या नागरिकांना या कचराकुंडीजवळ येण्याची विनंती केली. सारे आले, पण सर्वानी नाका-तोंडावर हात ठेवलेला. डॉ. निपुण विनायक यांनी या साऱ्यांना हसत हसत प्रेमाने विनंती केली, ‘आम्ही या ठिकाणी तुम्ही येण्या आधीपासून उभे आहोत. तुम्ही आत्ताच आलात, मग नाका-तोंडावर हात का ठेवता? हात बाजूला करा. आपण येथे गप्पा मारायच्या आहेत.’ साऱ्यांनी त्यांची विनंती कशीबशी मान्य केली. हात बाजूला केले. पण प्रचंड दरुगधीमुळे या नागरिकांना येथे उभे राहणे अशक्य झाले होते. एका महिलेने पर्याय काढला, ‘साहेब, आमच्या घरी या. तेथे आपण सर्व गप्पा मारू.’ डॉ. विनायकांचा तात्काळ प्रश्न आला, ‘घरी कशाला, इथे का नको?’ बाई तात्काळ म्हणाल्या, ‘इथे घाण आहे, खूप दरुगधी येते आहे.’ डॉ. विनायक म्हणाले, ‘तो आपणच केलाय ना? मग त्यात कसली दरुगधी आणि घाण!’ बाई उत्तरल्या ,‘घरात आम्ही स्वच्छता ठेवतो, तिथे दरुगधी नसते.’ डॉ. विनायक म्हणाले, ‘ मग शहरातली स्वच्छता आणि दरुगधी कोणी दूर करायची!’ बाई पटकन म्हणाल्या, ‘कोणी म्हणजे आपणच!’ बस्स! योग्य उत्तर त्या महिला नागरिकाकडूनच आले आणि व्यक्तिगत कर्तव्याची जाणीव कायद्याच्या बडग्याशिवाय झाली आणि ‘कचरा निर्मूलनाचा’ विचार काही क्षणात तेथे रुजला. नगरसेवक, सेवाभावी नागरिक आणि पत्रकार यांचे गट करण्यात आले आणि शहरातील सर्व कचराकुंडीजवळ अशीच प्रबोधन प्रक्रिया झाली, कुणी कुणाला दुखावले नाही आणि ‘कचरा निर्मूलनाचा’ स्वेच्छा विचार हा हा म्हणता सर्वत्र रुजला. नगरपालिकेच्या सभागृहात पुन्हा बैठक झाली. आलेल्या अनुभवाचे आदानप्रदान झाले. प्लॅस्टिक कॅरीबॅग पर्यावरणास घातक असल्याने गेल्या १२ वर्षांपासून त्या बंद करून कागदी वा कापडी पिशवीचा पुरस्कार करणाऱ्या अलिबागमधील नागरिक, महिला उद्योजक आणि मयूर बेकरीच्या संचालिका विद्या पाटील यांचे सर्वानी अभिनंदन केले. चांगल्या कामाचे मोठे आणि खुले कौतुक आणि त्यातून इतरांना स्फूर्ती असा विचार त्यामागे होता. तोही यशस्वी झाला. अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक स्वेच्छेने पुढे आले, सहभागी झाले आणि ‘कचरामुक्त अलिबाग’ या विचाराचे बळ वाढले.
पुढे काय?.. निर्णय झाला.. ‘‘अलिबाग शहरात उद्यापासून घंटागाडी कचरा घेऊन जाण्यासाठी येईल आणि सार्वजनिक कचराकुंडी शहरात एकही राहणार नाही.’’ हा निर्णय घेणारे केवळ नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन नव्हते, तर या निर्णयात सेवाभावी नागरिक, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पत्रकार असे सारे समाजघटक सहभागी होते. परिणामी, निर्णयाचे यश दृष्टिपथात होते. सकाळ झाली.. शाळेची घंटा वाजावी तशी घरासमोर आलेल्या घंटागाडीची घंटा ‘टण्..टण्..टण्’ अशी वाजायला लागली. बिल्डिंगमधून नागरिक आपापल्या घरातील कचऱ्याची बादली घेऊन आले. घंटागाडीतील माणसाने कचरा घंटागाडीत घेतला आणि गाडी पुढे सरकली. हे कसं घडलं याचा मागोवा घेताना एका महिला नागरिकाने प्रतिक्रिया दिली, ‘‘कालच्या आणि आजच्या वृत्तपत्रांत बातम्या वाचल्या, घरातील कचऱ्यासाठी बादली आणली आणि आज सकाळी कचरा कचराकुंडीत, रस्त्यावर न टाकता घंटागाडीत टाकला. इतकं तरी करायला हवं ना! ‘‘सद्विचार आणि सुयोग्य माध्यम यांचा मिलाफ झाल्यास परिवर्तन प्रचिती अटळ असते, याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. अर्थात परिवर्तन अडसरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ‘विरोधी पक्षातील’ एका नगरसेवकाने आपल्या प्रभागातील सार्वजनिक कचराकुंडी हटवण्यास विरोध केला. ती एकमेव कचराकुंडी वगळता शहरातील सर्व सार्वजनिक कचराकुंडी हटवण्यात नागरिकांच्या सहकार्यातून यश आले. डॉ. निपुण विनायक यांची बदली झाली. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कारकीर्द पूर्ण झाली. नगराध्यक्षपदी पार्वती मेंगाळ विराजमान झाल्या. नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी आले. असे कालपरत्वे होणारे बदल झाले, परंतु ‘कचराकुंडी मुक्त, स्वच्छ अलिबाग’ अबाधित राखण्यात नागरिकांनी यश मिळविले.
Recent Comments