हिट आणि हॉट

1 Nov
2009

‘ग्लोबल वॉर्मिग’ या संकल्पनेबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही तज्ज्ञ या संकल्पनेच्या बाजूने मत मांडतात, तर काहीजण ही संकल्पनाच खोटी असल्याचे सांगतात. त्यामुळे सर्वसाधारण माणसापुढे याबाबत काय करायचे, हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर जगभरात कितीही चर्चा-चर्वण सुरू असले, तरी आपल्याला मात्र या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मूलभूत गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे.. सध्यातरी एवढेच आपल्या हाती आहे!
यावर्षी व एकाच विषयावर प्रसिद्ध झालेली चिल’ आणि ‘द लाँग थॉ’ ही दोन पुस्तके! विषय- ग्लोबल वॉर्मिग! दोन्ही पुस्तके वाचनीय तर आहेतच, शिवाय रंजकसुद्धा! फक्त अडचण इतकीच, की दोन्ही पुस्तकांमध्ये परस्परविरोधी मते मांडण्यात आली आहेत. मांडणी अर्थातच प्रभावी शब्दांत! या पुस्तकांमधील मुद्दय़ांचा अर्थ ग्लोबल वॉर्मिग या विषयातील तज्ज्ञ कदाचित लावू शकतील, त्या मुद्दय़ांमधील सत्यता पडताळू शकतील, पण या परस्परविरोधी मतांमुळे सर्वसाधारण वाचकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे यातील नेमके कोणते मुद्दे खरे मानायचे? आणि ग्लोबल वॉर्मिग ही खरंच समस्या असेल तर तिचा सामना नेमका कशा पद्धतीने करायचा?
या एकाच उदाहरणावरून स्पष्ट होते, की ग्लोबल वॉर्मिग हा नावाप्रमाणेच आताच्या काळातील सर्वात ‘हॉट’ विषय आहे, त्याचबरोबर सर्वाना गोंधळात टाकणारासुद्धा! गोंधळात टाकणारा अशासाठी, की याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. सध्यासुद्धा अशाच उलटसुलट चर्चेमुळे त्याबाबत प्रचंड गोंधळ वाढविणारी स्थिती निर्माण झाली आहे. काही अभ्यासकांनी तर या संकल्पनेच्या मुळावरच आघात करणारे निष्कर्ष काढले आहेत. त्याद्वारे ही संकल्पनाच मोडीत काढली जात आहे. खरंतर गेली ११० वर्षे ग्लोबल वॉर्मिगची संकल्पना विकसित होत असताना आणि ती जागतिक पातळीवर स्वीकारली जाईपर्यंत तिच्याबाबत अनेकदा असा संशय व्यक्त केला गेला. आतासुद्धा पुन्हा मोठय़ा प्रमाणावर असेच संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने त्याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ‘या ग्लोबल वॉर्मिगचे करायचे काय?’ याचेसुद्धा उत्तर शोधण्याची गरज आहे.
माणसाकडून कार्बन डाय ऑक्साईड व इतर कार्बन वायू मोठय़ा प्रमाणात वातावरणात सोडले जात असल्याने ग्लोबल वॉर्मिग होत आहे, ही संकल्पना आज बहुतांश तज्ज्ञांनी स्वीकारली आहे. तरीसुद्धा तिला विरोध करणाऱ्यांचा गटही आपले अस्तित्व टिकवून आहे. दोन्ही तट आपापल्या परीने बाजू मांडत आहेत, तिला आधार म्हणून भक्कम पुरावेसुद्धा देत आहेत.
ग्लोबल वॉर्मिग हा खरे तर विज्ञानाचा विषय! तरीही त्याच्या सत्यतेबाबत तज्ज्ञ-शास्त्रज्ञांमध्येच एकमत नसेल, तर सर्वसाधारण माणसाने करायचे काय, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात या विषयाबाबत सध्या जागरूकता वाढते आहे. हवामानाच्या तीव्र व अपवादात्मक घटनांमध्ये ग्लोबल वॉर्मिगचा काही संबंध आहे का, ही बाब पडताळून पाहिली जात आहे. या विषयातील संशोधन व लोकशिक्षण याद्वारे हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठे प्रयत्न, मनुष्यबळ व पैसासुद्धा लावला जात आहे.
एकीकडे अशा प्रकारे हा विषय गांभीर्याने घेतला जात असताना मध्येच ही संकल्पनाच चुकीची असल्याचे संशोधन जाहीर होते. तशी पुस्तके प्रसिद्ध होतात. मग ही माहिती त्या तटाचे तज्ज्ञ-प्रचारक मोठमोठय़ाने सर्वांपर्यंत पोहोचवतात. परिणामी, ग्लोबल वॉर्मिगच्या संकल्पनेभोवती संशयाचे मळभ निर्माण होते आणि पुन्हा सर्व चर्चा ‘या संकल्पनेत तथ्य किती?’ या मुद्दय़ाकडे वळते. अशा विरोधाभासामुळे ग्लोबल वॉर्मिगची सत्यता आणि त्याच्या गांभीर्याबाबत सामान्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला नाही तरच नवल! तेच आज पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे संकट वास्तव आहे का आणि असेल तर त्यातून मार्ग काढायचा कसा, या प्रश्नांची उत्तरे देण्याची ही योग्य वेळ आहे.
अलीकडच्या काळाचा विचार केला तर ग्लोबल वॉर्मिगबाबत २००६ सालापर्यंत बरेच बोलले गेले आणि जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले गेले. जगातील बऱ्याचशा भागांतील हवामानाच्या नोंदी १८६१ सालापासून उपलब्ध आहेत. तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहता १९८०चे दशक व १९९०चे दशक अशी गेली दोन दशके सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. म्हणजे १९८०चे दशक हे तोपर्यंतचे सर्वात उष्ण दशक होते, पण १९९०च्या दशकाने त्याचा उच्चांक मोडीत काढला.
आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे गेल्या तीन-चार दशकांमध्ये जागतिक तापमानात वाढ होत आहे. उपलब्ध नोंदीनुसार १८६१ पासून आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात उष्ण असलेली दहा वर्षे १९९४ ते २००५ या काळातील आहेत. त्यापैकी १९९८ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण ठरले. त्या पाठोपाठ २००५ सालाचा क्रमांक लागतो. गेल्या दीडशे वर्षांमधील वैशिष्टय़ असे, की कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झाली आहे. किंबहुना कमालच्या तुलनेत किमान तापमानात झालेली वाढ दुपटीइतकी आहे.
हवामान नोंदींच्या या वास्तवाची नोंद झालेली असतानाच गेल्या दीड-दोन महिन्यांमध्ये जर्मनीच्या केल विद्यापीठातील ख्यातनाम तज्ज्ञ डॉ. मुजीब लतीफ यांनी एक ‘बॉम्ब’ टाकला. गेल्या काही दशकांमधील जागतिक तापमानाचा कल पाहता आणखी १०-२० वर्षे तरी या तापमानात वाढ होणार नाही आणि २०३० सालापर्यंत तापमानवाढ होण्याऐवजी त्यात घटच होत जाईल, असा निष्कर्ष मांडला आहे. त्याला आधार म्हणून दुसरे एक वास्तव मांडले जात आहे. ते असे, की जागतिक तापमानात १९९८ नंतर वाढ झालेली नाही. तापमानवाढीची संकल्पना स्वीकारली तर हा विरोधाभास कसा? या ११ वर्षांच्या काळातही कार्बन वायूंचे प्रमाण वाढलेच आहे. तापमान वाढण्यास हे वायू कारणीभूत असतील तर तापमानात घट का होतेय? मग ग्लोबल वॉर्मिगची संकल्पना स्वीकारायची कशी?
ही संकल्पना नाकारायची तर मग अधूनमधून वाढणाऱ्या तापमानाची जबाबदारी कोणावर टाकायची, हा प्रश्न आहेच. त्यालासुद्धा वेगळी कारणे दिली जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे सूर्याच्या उष्णतेत होणारा चढउतार! पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेपैकी ९८ टक्के उष्णता सूर्यापासूनच मिळते. त्यामुळे सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत चढउतार झाला तर जागतिक तापमान वर-खाली होतेच. याशिवाय सागरी प्रवाहांचाही प्रमुख प्रभाव जागतिक तापमानावर पाहायला मिळतो. समुद्र आणि महासागरांमध्ये थंड व उष्ण पाण्याचे प्रवाह सक्रिय असतात. त्यात विशिष्ट काळानंतर बदल होत राहतात. त्यांचे असे चक्रच अस्तित्वात आहे. सागरी प्रवाहांमध्ये साधारणत: दर ३० वर्षांनंतर बदल होतात. त्यामुळेच जागतिक तापमानात दर ३० वर्षांनी चढउतार होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत बरेच संशोधन झाले आहे.
अमेरिकेतील वेस्टर्न वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्रो. डॉन इस्टरबुक यांनी याबाबत काढलेले निष्कर्ष अलीकडेच बीबीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार १९४५ ते १९७७ या काळात प्रशांत महासागरातील एका थंड पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली. त्यानंतर (म्हणजे गेली ३० वर्षे) तापमानात वाढ होत गेली. हाही सागरी प्रवाहांचाच परिणाम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिगमुळे भविष्यात तापमानात कमालीची वाढ होणार असल्याचे बोलले जाते, त्यात काही तथ्य नसल्याचे म्हणणे मांडले जात आहे.
याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या ‘चिल’ या पुस्तकाद्वारे पर्यावरण संशोधक पीटर टेलर यांनी ग्लोबल वॉर्मिगच्या भाकितांवरच हल्ला चढविला आहे. ही भाकिते चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहेत आणि काही गोष्टी तर तद्दन खोटय़ा आहेत. काही अतिशय मोघम व ढोबळ अशा गोष्टींवर आधारित आहेत, असे त्यांनी दाखवून दिले आहे. ग्लोबल वॉर्मिगसाठी प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईड हा वायू कारणीभूत आहे. या वायूची तापमान वाढविण्याची क्षमता किती? हाच मुद्दा टेलर यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते या वायूची तापमान वाढविण्याची प्रत्यक्षात जी क्षमता आहे, त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट क्षमता आतापर्यंत गृहीत धरली गेली आहे. असा पायाच चुकीचा असेल तर त्या आधारावरील भाकिते वास्तव कशी मानायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ग्लोबल वॉर्मिग व हवामानबदल या विषयांतील प्रमुख संघटना असलेल्या इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजतर्फे (आयपीसीसी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाकितांबाबत या संघटनेतील शास्त्रज्ञांमध्येच मतभेद आहेत. मात्र, तिथे ग्लोबल वॉर्मिगच्या संकल्पनेला विरोध करणाऱ्या शास्त्रज्ञांचा आवाज दाबला जातो, असेही टेलर यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात पुढील काही दशके तापमानात घट होऊन ‘ग्लोबल कूलिंग’ घडणार असल्याचे टेलर यांचे म्हणणे आहे. हे वास्तव असले तरी जागतिक तापमानात वाढ होत असल्याचे ढोल वाजवले जात आहेत आणि ते रोखण्यासाठी अब्जावधी कोटी रुपयांची रक्कम खर्च केली जात आहे. त्यात काही सत्तांचे व संघटनांचे राजकीय हितसंबंध असल्याचा आरोपही टेलर यांनी केला आहे. यावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होत असल्याने जगातील कॅन्सर, एड्स, कुपोषण, मलेरिया यांसारख्या संकटांकडे दुर्लक्ष होत आहे.
ग्लोबल वॉर्मिगच्या संकल्पनेवर असा आघात होत असताना दुसरा गट ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यांवर बोट ठेवत आहे. ‘द लाँग थॉ’ या पुस्तकाद्वारे लेखक डेव्हिड आर्चर यांनी ग्लोबल वॉर्मिगमुळे पुढील हिमयुग अवतरणारच नाही, असा इशारा दिला आहे. या शतकाच्या अखेपर्यंत जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली तर ग्रीनलँडवरील बर्फ वितळून समुद्राची पातळी तब्बल सात मीटरने वाढण्याचा धोका त्यांनी वर्तविला आहे.
मालदीवसारख्या देशांना तापमानवाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मालदीवचे अध्यक्ष महंमद नाशीद यांनी अलीकडे समुद्रातच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढून मालदीवची अनेक बेटे पाण्याखाली जाणार असल्याचा धोका असल्याचे ते सांगत आहेत.. अशा या दोन्ही बाजू व त्यांच्यातील वाद गेली कित्येक दशके सुरू आहे. त्यात जेम्स लव्हलॉक-अल गोर एका टोकाला, तर बिजॉर्न लॉम्बर्ग-पीटर टेलर हे दुसऱ्या टोकाला आहेत. विशेष म्हणजे हे सर्वच दिग्गज असल्याने ग्लोबल वॉर्मिगबाबत कोणती बाजू स्वीकारायची, हा प्रश्न आहे. त्याचा धोका मानून त्यावर खर्च करावा तर इतर समस्यांकडे दुर्लक्ष होणार आणि त्याकडे दुर्लक्ष केले व हा धोका प्रत्यक्षात अवतरला तर त्याच्यामुळे उद्भवणाऱ्या भविष्यातील धोक्यांचा सामना कसा करायचा? हे कोडे सामान्यांना तर आहेच.
आपल्या देशाचा विचार करता बरेच धोरणकर्ते, संबंधित प्रशासकीय अधिकारी व महत्त्वाच्या जागी असलेल्या अनेकांमध्ये एकूणच गोंधळाचे वातावरण आहे. अशा स्थितीत आपण ग्लोबल वॉर्मिगबाबत काय विचार करायचा? हा कळीचा मुद्दा आहे. त्याचा सामना कसा करायचा, हे उत्तर शोधावे लागणार आहे.
गो टू द बेसिक्स
हा प्रश्न किचकट असला तरी या गोंधळाच्या स्थितीबाबत गांभीर्याने विचार केला, तर त्यातून मार्ग निघणे कठीण नाही. ग्लोबल वॉर्मिगमुळे दक्षिण आशियावर नेमका काय परिणाम होणार, याबाबतची इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संघटनेची भाकिते उपलब्ध आहेत. तेच आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही घडण्याची अधिक शक्यता आहे. त्यानुसार, या प्रदेशात हवामानाच्या घटनांची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच आता वर्षांतील जितके दिवस पाऊस पडत आहे, त्याचा काळ कमी होण्याचा धोका आहे. वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसाचे प्रमाण तेच राहिले तरी तो कमी कालावधीत पडेल. थोडय़ाच काळात जास्त पाऊस पडणार असेल तर अतिवृष्टीच्या घटना वारंवार घडणारच. दुसरीकडे काही कमी पावसाच्या भागांत दुष्काळाची तीव्रता वाढण्याचा धोका आहे. हे धोके लक्षात घेता त्यातून मार्ग काढणे शक्य आहे. त्यासाठी पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करावे लागेल. पाऊस कधी व किती पडणार, यावर आपले नियंत्रण नाही. त्यामुळे पाऊस कधीही पडला आणि कितीही पडला तरी तो ‘घेण्याची’ आपली क्षमता असायला हवी. त्यामुळे मिळणारे पाणी साठविणे आणि तो व्यवस्थित वर्षभर वापरणे, याबाबतचे आपले कौशल्यही वाढवावे लागेल. पडणारा पाऊस तसाच वाहून जाऊ न देता, पाणी जमिनीत मुरण्याची तसेच ते चांगल्या पद्धतीने साठविण्याची व्यवस्था हवी. म्हणजेच पडणारे पाणी वेगाने वाहून जाऊ नये व ते मुरावे यासाठी डोंगर-माळरानांवरील कुरणे, झुडपे-दाट जंगले असे वनस्पती आवरण असायला हवे. ते असेल तर मोठा पाऊस पडला तरी जास्तीत जास्त पाणी मुरेल आणि त्याचे नद्या-नाल्यांमधून वाहण्याचे प्रमाण आपोआपच कमी होईल. त्याचबरोबर नद्या-नाल्यांसारखे नैसर्गिक प्रवाह व्यवस्थित असतील (त्यांच्यावर अतिक्रमण झालेले नसेल व ते बुजलेले नसतील) तर मग जास्त पाणी वाहिले तरी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. पण आपण ‘विकासा’च्या नावाखाली हे प्रवाहच बुजवून टाकले तर नुकसान होण्यासाठी मोठा पाऊस पडण्याची गरज नाही. आणि या प्रवाहांची व्यवस्थित काळजी घेतली तर मोठा पाऊस पडला तरी फारसे घाबरण्याचे कारण नाही.
ग्लोबल वॉर्मिगचे विपरीत परिणाम होवोत अथवा न होवोत, आपल्याला एरवीसुद्धा या मूलभूत गोष्टींची काळजी घेणे आवश्यकच आहे. ग्लोबल

पाणी आडवा ! पाणी जिरवा !

पाणी आडवा ! पाणी जिरवा !

वॉर्मिगच्या परिणामांच्या काळात त्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागेल. बदलत्या हवामानाचा वेगवेगळय़ा पिकांवर विपरीत परिणाम होऊन शेतीच्या उत्पादनात घट होणार असल्याचा एक मोठा धोका बोलून दाखवला जातो. हे नुकसान टाळण्यासाठी दुष्काळी स्थितीत व पुराच्या वेळीसुद्धा टिकून राहतील, अशा पिकांच्या नवनव्या जाती विकसित करण्याची आवश्यकता आहे. आतासुद्धा पाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने बऱ्याचशा भागाला पाणी पुरविणे शक्य होत नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीतही अशा नव्या जाती विकसित करणे व शेतीचे उत्पादन वाढविणे आपल्यासाठी गरजेचेच आहे. ग्लोबल वॉर्मिग प्रत्यक्षात अवतरणार असेल तर याच गोष्टी आपणाला मोठय़ा प्रमाणात कराव्या लागतील. त्यामुळे आपणाला वेगळे काही करण्याची गरज नाही, तर मूलभूत गोष्टी टिकविण्याची व त्या कार्यक्षम ठेवण्याचीच गरज आहे.
ग्लोबल वॉर्मिगच्या सत्यतेबाबत कितीही चर्चा-चर्वण होत राहीलच. आपण मात्र किमान या मूलभूत गोष्टी तरी सुधारू. त्याद्वारे आपल्याला आताच्या समस्यासुद्धा सोडविण्यास मदत होईल. म्हणजेच ग्लोबल वॉर्मिगची संकल्पना खरी असो वा खोटी, आपले हे प्रयत्न वाया जाणार नाहीत, हे निश्चित! या संकल्पनेच्या सत्यतेबाबत जगाला वाद घालू द्या. त्यात आपली बाजू मांडण्यासाठी शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व राजकीय प्रतिनिधी आहेतच. आपण समाज म्हणून त्याच्या संभाव्य परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी निश्चितच वाटा उचलू शकतो. सध्या तरी गोंधळाच्या परिस्थितीत तेच आपल्या हाती आहे. म्हणूनच नैसर्गिक प्रवाह, जंगले व इतर साधनसंपत्ती व्यवस्थित वापरणे आणि त्या व्यवस्था राखणे याची गांभीर्याने काळजी घ्यावी लागेल. ते केले तर ग्लोबल वॉर्मिगच्या परिणामांची चिंता करण्याचे काहीच कारण नाही.

अभिजित घोरपडे

abhighorpade@rediffmail.com

साभार लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=19517:2009-10-30-13-39-21&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117


Comment Form

top