शेतात रमलेला शास्त्रज्ञ – साभार लोकसत्ता, संपादकीय

16 Sep
2009

हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे निधन झाले. जगाला, विशेषत: तिसऱ्या जगाला अन्नसुरक्षा देणारा कृषिशास्त्रज्ञ आणि श्रीमंत मनाचा माणूस गेला. डॉ. नॉर्मन बोरलॉग गेले असले तरी त्यांनी केलेले कार्य व त्याची उपयुक्तता आजही कायम आहे. पुढच्या काळातही कायम राहील. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या झपाटय़ाने वाढून आज ती ११० कोटींच्या पुढे गेलेली असतानाही आपल्या देशाला अन्नाच्या बाबतीत सुरक्षितता लाभली आहे, याचे मूळही बोरलॉग यांच्या संशोधनात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या पुढच्या-मागच्या काळात संपूर्ण जगच एका मोठय़ा संकटाचा सामना करत होते. दुसऱ्या महायुद्धातील संहार व प्रचंड हानी यांची पाश्र्वभूमी होतीच. त्याच्या जोडीनेच जगाची भूक कशी भागवायची, ही मोठी समस्या होती. विशेषत: भारतासह आशियाई देश, दक्षिण अमेरिकी देश व आफ्रिकी देशांमध्ये हे संकट अधिक तीव्र होते. लोकांची भूक भागविण्यासाठी अमेरिकेसह इतर देशांकडून अन्नधान्याची आयात करावी लागत होती, जोडीने मानहानीसुद्धा सहन करावी लागत होती. तिसऱ्या जगातील बहुतांश देशांची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात भारतासारखीच होती. याच काळात १९४० व ५०च्या दशकात बोरलॉग यांचे मेक्सिकोमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी संशोधन सुरू होते. त्यात त्यांना यश आले आणि साधारणत: १९६०च्या दशकात जगभरातून अनेक देशांनी त्यांचे संशोधन स्वीकारले आणि पाठोपाठ काही वर्षांतच त्यांनी अन्नसुरक्षासुद्धा प्राप्त केली. भारतातही १९६०च्या दशकात प्रामुख्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोरलॉग यांच्या संशोधनात रस दाखविला. त्याचे फायदे काही वर्षांतच हरितक्रांतीच्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली, ते आजही कायम आहेत. स्वातंत्र्याच्या सुमारास देशाची लोकसंख्या ३५ कोटींच्या आसपास होती. ती झपाटय़ाने वाढत होती, मात्र त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत नव्हते. त्यामुळे पुढच्या काळात बोरलॉग यांच्या संशोधनाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी इंदिरा गांधी यांनी दाखविली. अन्नधान्याचे, विशेषत: गव्हाचे उत्पादन वाढविण्यास त्याचा फायदा झालाच; शिवाय बोरलॉग यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्याकडे डॉ. स्वामिनाथन यांच्यासारखे कृषिशास्त्रज्ञ घडले. त्यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याचे काम पुढे नेले. त्यातूनच भारतात संकरित बियाणे, सिंचन व रासायनिक खते-कीटकनाशके यांच्या जोरावर हरितक्रांती साकारली. त्यामुळे पिकांच्या एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे एकाच जमिनीत वर्षांला दोन-तीन पिके घेणे शक्य झाले. त्यामुळेच भारताचे अन्नधान्य उत्पादन, जे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पाच कोटी टनांच्या आसपास होते, ते एकविसाव्या शतकात प्रवेश करताना तब्बल २१ कोटी टनांपर्यंत पोहोचले. त्यामुळेच देश एका मोठय़ा संकटातही तग धरू शकला. हरितक्रांतीबाबत काहीजण टीका करतात व तिचे काही दुष्परिणाम आज पाहायला मिळत असल्याचे सांगतात. पण हा दोष कृषिसंशोधनाचा किंवा विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा नाही, तर शेतीच्या व पाण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा आहे. जास्त पाणी दिल्यावर उत्पादन वाढते, असे म्हटल्यावर प्रमाणाबाहेर पाणी देऊन आपण जमिनी खराब करणार असू, तर त्यात हरितक्रांतीचा दोष कसा? हेच कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापराबाबत पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दोष दाखवून हरितक्रांतीचे महत्त्व कमी लेखता येत नाही. हरितक्रांती आणि त्याद्वारे शेतीक्षेत्रात होणारे संशोधन तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्याने बोरलॉग यांचे स्वप्नसुद्धा साकार झाले. कारण आपल्या संशोधनाचा जनहितासाठी कसा उपयोग होईल, यावरच प्रामुख्याने बोरलॉग यांचा भर होता. याचबरोबर त्यांनी बोरलॉग हेरिटेज फाऊंडेशनच्या माध्यमातून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांचे विचार तर सध्याच्या काळातही शास्त्रज्ञ, संशोधकांना उपयुक्त ठरतील असेच आहेत. विशेषत: प्रयोगशाळेत किंवा केवळ चार भिंतींच्या आत संशोधन करून शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्यांनी तर ते आत्मसात करावे असेच आहेत. शेतात न जाणारा कृषिशास्त्रज्ञ कसा असू शकतो? त्याला जमिनीवर असलेल्या समस्या काय कळणार आणि आपण कोणत्या प्रश्नावर काम करायला हवे, हे तरी कसे समजणार? अस्सल कृषिशास्त्रज्ञाला पिकातून वाहणाऱ्या वाऱ्याचे संगीत आणि गंध कळायला हवा, असे ते सांगत. इतका हा मातीशी व शेतीशी एकजीव झालेला शास्त्रज्ञ! त्यामुळेच त्यांना १९७० साली नोबेल पारितोषिक जाहीर झाले, तेव्हाही ते प्रत्यक्ष शेतातच काम करत होते. सध्याच्या काळात जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) बियाणांना बराच विरोध सुरू आहे. जीएम बियाणे म्हणजे बोरलॉग यांनी केलेल्या संशोधनाचीच पुढची पायरी! या बियाणांना होत असलेल्या विरोधाबाबत ते कडाडून टीका करायचे. पण त्याच वेळी हे संशोधन कोणा खासगी कंपन्यांची मक्तेदारी न बनता ते सार्वजनिक क्षेत्रातच व्हावे, अशी सूचनासुद्धा करायचे. बोरलॉग यांच्या कार्याचा भारताशी संबंध जोडायचा तर तो शेतीपासून राजकारणापर्यंत आणि आजच्या सामाजिक प्रश्नांपर्यंत पोहोचतो. त्यांच्या  प्रत्यक्ष कार्य व प्रेरणेतूनच १९७०च्या दशकात भारत अन्नसुरक्षा मिळवू शकला. त्याचबरोबर आपल्याकडे रुजलेल्या सहकार चळवळीतही हरितक्रांतीचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकार राबवला, पण त्याला अशी कृषिसंशोधनाची साथ मिळाली नसली तर समृद्धी आली नसती व सहकार चळवळसुद्धा बहरली नसती. त्यामुळेच सहकारातील आजच्या नेत्यांनी यशाचे फेटे उडवताना त्याच्या मुळाशी कृषिसंशोधन व बोरलॉग हेसुद्धा आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थात, आजच्या सहकारसम्राटांची ‘उंची’ पाहता कितीजणांना बोरलॉग माहीत असतील, हा प्रश्नच आहे. आपल्याकडे ही हरितक्रांती आणि अन्नधान्य सुरक्षितता येत असताना ती समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पाझरणे आवश्यक होते व आहे. तसे झाले नाही तर त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होण्याचा इशारा तेव्हाच यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्यांनी दिला होता. त्यातील विषमता रोखली नाही तर हरितक्रांतीतूनच लाल क्रांती जन्म घेईल, असे त्यांनी म्हटले होते. घडलेही तसेच! पूर्वी केवळ शहरे किंवा ग्रामीण भागातील विशिष्ट समाजापर्यंत मर्यादित असलेली संपत्ती हरितक्रांतीमुळे जमीन असलेल्या वर्गापर्यंत पोहोचली. पण ती त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली. ती खाली पाझरली नाही किंवा पाझरू दिली गेली नाही. त्यातूनच लाल क्रांतीला बळ मिळण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. नक्षलवादाची समस्या तीव्र होण्याचा काळ आणि हरितक्रांतीचे फायदे मिळण्याचा साधारणत: १९६८-६९ चा काळ पाहता या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे दिसते. अर्थात, असे घडेल आणि संपत्ती निर्माण होऊन एकवटली जाईल, या भीतीपोटी संपत्ती निर्माण करण्यालाच विरोध करण्याची म्हणजे हरितक्रांतीलाच दूषणे देणाऱ्यांची भूमिकाही उफराटी म्हणावी लागेल. हरितक्रांतीमुळे जमीन असलेला वर्ग नव्याने सधन बनला, तशी त्यांची नवी राजकीय शक्तीसुद्धा उदयाला आली. तीच उत्तर प्रदेश-बिहारमध्ये मुलायम-लालू यादव, तसेच चौधरी चरणसिंग, देवीलाल, चौटाला यांच्या रूपाने पाहायला मिळाली. तिथल्या तिवारी, उपाध्याय, मिश्रा, पांडे, जोशी या राजकारणातील नावांची जागा या जमिनी कसणाऱ्या वर्गानी घेतली. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या (मुख्यत: आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये) राजकारणात सुरुवातीला दबावगट आणि पुढे टगेगिरी वाढत गेली. त्यालासुद्धा हरितक्रांतीचीच पाश्र्वभूमी आहे. एखाद्या प्रश्नावर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय सांगता येतो, पण त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी व चुकीचे नियोजन याला ते  उपाय राबविणारे जबाबदार असतात. बोरलॉग यांनी जन्माला घातलेल्या हरितक्रांतीबाबतही आपल्याकडे असेच काहीसे घडल्याचे म्हणावे लागेल. बोरलॉग हे अमेरिकेचे असले आणि त्यांनी मुख्यत: मेक्सिकोमध्ये गव्हाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या असल्या तरी त्यांचा भारताशी घनिष्ठ संबंध होता. ते गेले तरी त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजावर झालेला खोलवर परिणाम पुढील बराच काळ कायम राहील. बोरलॉग यांच्या संशोधनामुळे जगाच्या बऱ्याच प्रदेशांतील भूक भागली, पण आफ्रिकी देशांमध्ये फार काही करता आले नाही, याची त्यांना खंत होती. हे आव्हान पुढील पिढीसाठी ठेवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला!

साभार लोकसत्ता

संपादकीय


Comment Form

top