भूजल पातळी घटतेय वर्षाला एक फुटाने ! नासाच्या संशोधकांनी दिला इशारा….

31 Aug
2009

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे राजकारण्यांसह सामान्य जनांचा जीव कासावीस झाला असतानाच नव्या संकटाची चाहूल लागली आहे. अमेरिकेतील  शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार उत्तर भारतातील दिल्लीसह प्रमुख शहरातील भूजलाची पातळी दरवर्षाला सुमारे एक फुटाने घटत असल्याचे आढळून आले आहे.

निसर्गाच्या चक्रात माणसांचा बेसुमार हस्तक्षेप झाल्यामुळेच हे संकट ओढवले असून यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यातील वास्तव अधिकच गंभीर असेल, असा स्पष्ट इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी घटत गेल्यास त्याचा पहिला फटका शेतीला बसणार असून कृषी उत्पादनाचे चक्रच त्यामुळे कोलमडण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

नासाने सॅटेलाइटद्वारे केलेल्या निरिक्षणात दरवर्षाला सुमारे ३३ सेमीने (एक फूट) पाण्याची पातळी घटत असल्याचे आढळून आल्याचे नासाच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. दिल्लीसह हरयाणा, राजस्थानातील पाण्याच्या पातळीचा २००२ ते २००८ या कालावधीत करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या या हरितपट्ट्याला मोठा फटका बसणार असून त्यावर गांभीर्याने आत्ताच विचार होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

(वृत्तसंस्था)

साभार – महारष्ट्र टाइम्स

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4952929.cms


Comment Form

top