आईविना भिकारी ! संपादकीय, लोकसत्ता.

16 Jul
2009
Kawaryatra, Haridwar

कवडयात्रा, हरीद्वार.

88

गंगानदी, हरीद्वार.

19

गंगानदी, कानपूर.

जगातील मोठय़ा नद्यांच्या प्रवाहात पन्नास-साठ वर्षांमध्ये लक्षणीय बदल झाले असल्याचे अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फेरिक रीसर्च’ या संस्थेच्या सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गंगेसह जगातील काही प्रमुख नद्या पन्नास वर्षांमध्ये कोरडय़ा पडतील, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. या संस्थेतर्फे जगातील ९२५ मोठय़ा नद्यांच्या १९४८ ते २००४ या काळातील प्रवाहांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. त्यापैकी एक-तृतीयांश मोठय़ा नद्यांच्या प्रवाहात लक्षणीय बदल घडून आल्याचे आढळून आले आहे. गंगेसारख्या काही नद्यांच्या प्रवाहात घट झाली, त्याच वेळी काही नद्यांच्या प्रवाहात वाढ झाल्याचेसुद्धा आढळून आले आहे. पण प्रवाहात घट झालेल्या नद्यांची संख्या खूपच जास्त आहे. शिवाय या नद्या दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशातून वाहणाऱ्या आहेत. त्यात गंगेसह अमेरिकेतील कोलॅरॅडो, आफ्रिकेतील नायजर, चीनमधील व्हॉग व्हो किंवा पीत नदी या नद्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येला अन्नधान्य व पाण्याची टंचाई भासेल, असा इशाराही या अहवालाद्वारे देण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या काळात हा इशारा म्हणजे धोक्याचीच घंटा आहे. नद्या आटण्यास मुख्यत: त्यांचे वाढलेले शोषण हेच प्रमुख कारण ठरले आहे. धरणांची निर्मिती तसेच शेती व उद्योगांसाठी अवास्तव प्रमाणात पाण्याचा वापर झाल्याने ही स्थिती येऊ घातली आहे. त्यातच हवामानातील बदलांच्या परिणामांचीसुद्धा भर पडली आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या निमित्ताने एकूणच जगभरातील नद्यांची अवस्था व आपला त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. गंगा, चीनमधील व्हांग हो यासारख्या नद्या पन्नास वर्षांमध्ये आटणार असतील, तर ते अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल. कारण याच नद्यांनी जगातील अतिशय प्रगत व समृद्ध संस्कृतींना जन्म दिला आणि त्याचा विकासही घडवून आणला. जगातील कोणतीच संस्कृती पाण्याशिवाय म्हणजेच मुख्यत: नद्यांशिवाय उदयाला आलेली नाही. माणूस सुसंस्कृत झाला, तो नद्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या मदतीनेच! भारत-पाकिस्तानपासून इजिप्तपर्यंत आणि चीनपासून थेट मध्य आशियापर्यंत भरभराटीला आलेल्या सर्वच प्राचीन संस्कृतींना कोणत्या ना कोणत्या नदीचा सहवास लाभलाच आहे. अगदी महाराष्ट्रातील घोड, प्रवरा, भीमा यांच्यासारख्या लहान-मोठय़ा नद्या असोत, नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सिंधू, नाईल, युफ्रेटस-टायग्रिस यांसारख्या नद्या. या सर्व नद्यांनी वेगवेगळ्या कालखंडात आपल्या काठावर अतिशय समृद्ध संस्कृतींना जन्म दिला आहे. भारताचा विचार केला तर साधारणत: साडेचार-पाच हजार वर्षांपूर्वी वायव्य भारतात सिंधू-सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यात प्रगत संस्कृती बहरण्यास सुरुवात झाली. या नद्यांनी सिंधू संस्कृतीला आकार दिला. भारतात खऱ्या अर्थाने उदयाला आलेली हीच पहिली विकसित नागर संस्कृती! पुढे रामायणाच्या कालखंडात गंगा-यमुनेच्या खोऱ्यात विकसित मानवी संस्कृतींचे दर्शन घडले. महाराष्ट्रातही भीमा खोऱ्यातील घोड नदीच्या काठावर इनामगाव या ठिकाणी इसवी सनपूर्व १६०० च्या सुमारास जोरवे संस्कृतीने जन्म घेतला. याशिवाय प्रवरा नदीवरचे नेवासे, गोदावरीवरील जोरवे, तापी नदीवरचे प्रकाशे (धुळे) ही प्रसिद्ध ठिकाणेसुद्धा नदी व तिच्या काठावरील प्राचीन संस्कृती यांच्यात असलेले नाते दाखवून देतात. जगभरातील प्राचीन इतिहासाचा धांडोळा घेतला, तरी भारतात घडले तेच इतरत्रसुद्धा घडल्याचे पाहायला मिळते. चीनची अतिशय प्राचीन संस्कृती उभी

 गंगानदी, कोलकोता.
गंगानदी, कोलकोता.

राहिली ती ‘व्हांग हो’ (पीत नदी) नदीच्या खोऱ्यातच. या नदीला खूप मोठे पूर येत असल्याने तिला ‘चीनचे अश्रू’ असे संबोधण्यात येते, पण तिच्याच खोऱ्यात आपली प्राचीन संस्कृती नांदल्याचे चीनने पाहिले आहे. इजिप्तची प्राचीन संस्कृती आणि त्यातील पिरॅमिड्स-ममीज अशा अफलातून गोष्टी आजही जगाला आश्चर्यचकित करतात. या आश्चर्याना जन्म देणारी ही संस्कृती तिथल्या वाळवंटात नांदली, ती नाईल नदीमुळेच! मेसोपोटेमियाचा (सध्याच्या इराक) विकास झाला तोसुद्धा ‘युफ्रेटस’ आणि ‘टायग्रिस’ नद्यांच्या जोरावरच. या दोन नद्यांच्या मधल्या सुपीक प्रदेशात असणाऱ्या मेसोपोटेनियाने विविध कालखंडात प्रगत अशी संस्कृती जन्माला घातली. अगदी मध्य आशियातील ‘बॅक्टरिओ-माíजयाना’ संस्कृतींच्या वसाहतींना (आताचा तुर्कमेनिस्तान, उझ्बेकिस्तान) ‘अमोदरिया’ आणि ‘सिरदरिया’ नद्यांनीच विकसित केले. यावरून नद्यांनी मानवी संस्कृतीला कशा पद्धतीने विकसित केले याची स्पष्ट कल्पना येते. आणि म्हणूनच माणसाच्या इतिहासात डोकावताना, नद्या नसल्या तर माणूस इतका प्रगत झाला असता का, असा प्रश्न पडतो. या प्रश्नाच्या उत्तराबाबत कदाचित मतभेद होतील, पण मानवी संस्कृती प्रगल्भ होण्यामधील नद्यांचे महत्त्वाचे स्थान कोणीही नाकारणार नाही. नद्यांनी केवळ मानवी संस्कृती विकसित केली नाही, तर त्याही पलीकडे जाऊन माणसाला संस्कार दिले, श्रद्धा दिली आणि जगण्याची एक पद्धतीसुद्धा दिली. आधुनिक काळात आपण नद्यांना प्रदूषित करत असलो, तरी नदी ओलांडताना आजही अनेक हात जोडले जातात. आजच्या काळातही गंगाजलाला तितकेच महत्त्व आहे आणि

गंगा आरती, हरीद्वार.
गंगा आरती, हरीद्वार.

नद्यांबद्दल आजही प्रत्येक माणूस भावनिकदृष्टय़ा अगदी सहजपणे जोडला जातो; तो नदीच्या पात्रात डुंबला असेल किंवा नसेल तरीसुद्धा! नद्यांचे आपल्यावरील उपकार व त्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच माणसानेसुद्धा तिला मातेचा किंवा देवतेचा दर्जा दिला. विशेषत: आपण पौर्वात्यांच्या नदीबद्दलच्या भावना ही बाब स्पष्ट करतात. तरीसुद्धा आज जगभरात नद्यांची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. त्यांचे प्रदूषण, त्यांचे प्रचंड शोषण (पाण्याचा अर्निबध उपसा) आणि त्यांच्यावरील अतिक्रमणामुळे त्या हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावरच आहेत. मध्य-पूर्वेतील जॉर्डन नदी असेल किंवा बहुचर्चित नाईल या नद्या आता समुद्रापर्यंत पोहोचतही नाहीत. हीच वेळ आता गंगेसह इतरही काही नद्यांवर येण्याची भीती प्रस्तुत अहवालात वर्तविण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर गंगेच्या प्रवाहात झालेली वीस टक्क्य़ांची घट, तिच्या पाण्याचा प्रचंड उपसा व हिमालयातील हिमनद्या आक्रसण्यामुळे तिच्यावरही ही वेळ आली तरी आश्चर्य वाटायला नको. याशिवाय जगातील दहा मोठय़ा नद्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येच्या ‘कॅन्सर’ ने घेरले असल्याचे वास्तव दोनच वर्षांपूर्वी विश्व वन्यजीव निधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) अहवालात उघड झाले आहे. पण आजकाल नद्यांकडे इतके दुर्लक्ष होणे हे कशाचे निदर्शक म्हणायचे? ज्या नद्यांनी आपणाला इतका आधार दिला आणि आजही त्यांच्या पाण्यावरच जगातील बहुतांश जनता जगते आहे, त्यांनाच आता आपण विसरत आहोत का? सध्या आपण एका मोठय़ा विरोधाभासाच्या परिस्थितीत जगत आहोत. एकीकडे गंगाजल

पवित्र म्हणून तीर्थासमान मानायचे आणि त्याच वेळी गंगेलाच (आणि सर्वच नद्यांना!) प्रदूषित करण्याची संधी सोडायची नाही. निसर्ग-पर्यावरणाबाबत

गंगानदी, जाजमाऊ, कानपूर.

गंगानदी, जाजमाऊ, कानपूर.

जागरूकता वाढत असतानाच नद्यांची आणि एकूणच पर्यावरणाची स्थिती मात्र खालावत आहे. हे चित्र केवळ महाराष्ट्रात किंवा एकटय़ा भारतात नाही, तर जगभर आहे. मग त्या अमेरिका, युरोपातील नद्या असोत किंवा आफ्रिका, दक्षिण आशियातील नद्या, सर्वाच्या पात्रात हीच बाब ठळकपणे पाहायला मिळत आहे. नद्यांचे महत्त्व आपणाला माहीत नाही किंवा नद्यांवर विपरीत परिणाम झाला तर आपले पर्यावरण-अर्थकारण यांच्यावर नेमका काय परिणाम होईल याची आपणाला कल्पना नाही, असेही नाही. तरीसुद्धा बिघडत चाललेल्या नद्या हे जगभरातील वास्तव आहे. नद्या व माणूस यांचा घनिष्ट संबंधांचा इतिहास पाहिला, तर सध्या माणसाने कृतघ्नपणाचा कळस गाठल्याचे दिसते. ज्या जननीमुळे सुसंस्कृत माणसाने ‘जन्म’ घेतला, तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष तर झाले आहे. नुसतेच दुर्लक्ष नाही, तर तिच्यावर दररोज आघात करून माणूस तिच्या मृत्यूलाच कारणीभूत ठरत आहे. नद्यांचे योग्य व्यवस्थापन न करता त्यांचे पाणी वाट्टेल तसे वापरून त्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्यासही अटकाव करीत आहोत. त्याद्वारे पर्यावरणाचे नुकसान तर करत आहोतच. त्याच्या जोडीनेच नद्यांचा नैसर्गिक प्रवाहातून वाहण्याचा हक्कही हिरावून घेत आहोत. माणूस ज्या भौतिक विकासाच्या टप्प्यात आहे, त्यावरून तो निसर्गावर मात करून तिन्ही जगांचा ‘स्वामी’ बनण्याच्या मार्गावर आहे. पण हे करताना आपल्याच विकासाला कारणीभूत ठरलेल्या जननीशी कृतघ्न बनल्यास माणसाला पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भिकारी व्हायला वेळ लागणार नाही. नद्यांबाबतच्या प्रस्तुत जागतिक अभ्यासाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

साभार- लोकसत्ता.

http://www.loksatta.com/daily/20090716/edt.htm

Comment Form

top