सावित्री म्हणजे उष:काल. काळोखातून वाटचाल करून उष:कालाकडे जाणारी सावित्री आपल्यालाही हाच संदेश देते. या सावित्री कथेमध्ये त्या व्रताचेच नाव ‘वटसावित्री’ ठेवून वडाच्या झाडाचेही माहात्म्य वाढवले आहे- वैशाली कुलकर्णी

10 Jun
2009

व्रतांचा संबंध हा कुटुंबाबरोबरच समाजाशी व संस्कृतीशीही असतो. (५ जून हा पर्यावरण दिवस आहे). वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे सण-व्रते येतात. आपल्या पूर्वजांनी धर्मसंकल्पना व आरोग्य यांचा योग्य समन्वय साधूनच रूढी बनवल्या होत्या. त्यांनाच त्यांनी धार्मिकतेची डूब दिली.
या व्रतांचा संबंध पशुपक्षी, प्राणी व वनस्पतींशीही जोडलेला दिसतो. पोळ्याच्या सणाला बैलांचे महत्त्व, वसुबारसला गायवासरू, आषाढ अधिक मासात कोकिळा, पितृ पंधरवडय़ात कावळे, हे पक्षी-प्राण्याविषयी तसेच चैत्री पाडव्याला कडुलिंब, दसऱ्याला आपटय़ाची पाने, मंगलागौरीला पत्री, श्रावणात केळीची पान- हळदीची ओली पाने, गणेशपूजनासाठी दुर्वा- बेल-तुळस-शमी, शंकराला बेल. अशा वेगवेगळ्या झाडांची पाने, पूजेसाठी वापरली जातात. तसेच वटवृक्षाचे महत्त्व वटपौर्णिमेला आहे.
पाँडिचेरीच्या अरविंदांनी ‘सावित्री’ हे महाकाव्य, महाभारत- वनपर्वात आलेल्या ‘सावित्री’ उपआख्यानावरून रचलेले आहे. महाभारतातल्या ७०० ओळींमधल्या कथेचे २४००० ओळीतले महाकाव्य कवी अरविंदांनी पौराणिक कथेचे रूपकात्मक कथेत रूपांतर केले.
‘‘जीवनाचे- जगण्याचे व मृत्यूचे कोडे कोणालाच उलगडता आलेले नाही. ते गूढच राहिलेले आहे. ते शोधण्याचे प्रयत्न मानवाने अखंडपणे चालूच ठेवलेले आहेत. मृत्यूमुळे गुंता वाढतो. एका गुंत्यातून दुसरा गुंता तयार होतो. मृत्यू म्हणजे जीवनाचा अभाव, मृत्यू म्हणजे सगळ्या अस्तित्वाचा शेवट जिवंतपणी मृत्यूला न ओळखणारे त्यांना मृत्यू परकाच वाटतो.’’ सावित्रीही सूर्योपासनेपासून तिच्या पित्याला मिळालेले वरदान होती. तिला आपल्या पतीचा मृत्यूचा दिवस ठावूक होता. वर्षभर ती मृत्यूविरुद्ध लढण्याची तयारी करत होती. तिने मृत्यूची कधीच विनवणी केली नाही. देवाकडे प्रार्थना करून रदबदलीही केली नाही आणि परिस्थितीपासून पळही काढला नाही की शरण गेली नाही. एकटीने, एकाकीपणाने कोणालाही काहीही कळू न देता तिने त्या दिवसाची जय्यत तयारी केलेली होती.
कठोपनिषदामध्ये यमराजांना सावित्रीप्रमाणे भेटलेली दुसरी व्यक्ती म्हणजे नचिकेत. त्याला मृत्यूकडूनच आत्मरहस्य समजावून घ्यायचे असते. यमराज नचिकेताला समजावतात. ‘‘जो जिवंतपणी मला ओळखत नाही तो परत परत माझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो पण जिवंतपणी मला ओळखता आले तर जगावं कसं हे माणसाला समजेल.’’
सावित्रीला ते पूर्णपणे समजलेलं होतं. मृत्यूविषयी तिला कधीच भीती वाटली नाही. आपल्या मनावर विचारांचा पगडा असतो. तेव्हा विचारांनीच तयार झालेली अंतर्मनातली चित्रे आपण पाहतो. जेव्हा विचाररहित स्थिती प्राप्त होते तेव्हाच अंतर्मनातील शक्ती जागृत होतात. कारण आपल्या अंतर्मनामध्ये प्रचंड शक्तीचा साठा साठवलेला आहे.
‘‘जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती घडते तशीच घडू द्या. त्या घटनेचे कर्तेपद वा त्या विषयीचा विचार करू नये. फक्त अनुभव घेत राहावा. समर्पणाची भूमिका स्वीकारावी. तेव्हाच अंतरंगामधली ती सुप्त शक्ती जागृत होते व कार्य करू लागते.’’
सावित्रीचे मन स्वच्छ होते. त्यामुळेच ती मृत्यूला पाहू शकली. त्याच्याशी बोलू शकली. शेवटी मृत्यूलाही तिने आपला सुहृद बनवले. त्याला तिचा विचार करायला भाग पाडले. सावित्रीने यमाबरोबर सामना करताना केवळ प्रेम हेच शस्त्र वापरले खरे प्रेम सर्वानाच जिंकते, त्यामुळे यमाला-प्रत्यक्ष मृत्युलाही सावित्रीपुढे शरणागती पत्करावी लागली.
खरे आदर्श मानवी अंत:करणामध्येच वसलेले आहेत. ते हृदयाच्या प्रेरणेतून निर्माण होतात. कारण प्रेम ही दैवी शक्ती आहे शाश्वतऽ आहे.
आज क्षुल्लक कारणांनी घटस्फोट घेतले जातात. एकमेकांचे गुण पाहण्याऐवजी केवळ दोष शोधून स्वत:ची कीव केली जाते. ‘मी महान’ हे असतेच.
सावित्री आख्यानामध्ये प्रेमाची महती सांगितलेली आहे. प्रेमाचा अंकूर संसारामध्ये स्त्री पुरुषांच्या चांगल्या संबंधांनी फुलतो. अमरप्रेम पृथ्वीवरून आटून जाऊ नये. जो मानवतेवर प्रेम करतो तोच देवावर प्रेम करू शकतो.
मनाला मर्यादित अवस्थेमध्ये न राहता त्यापासून मुक्त करून महामानव बनवणे हे सावित्रीचे खरे कार्य आहे.
सावित्री म्हणजे उष:काल . काळोखातून वाटचाल करून उष:कालकडे जाणारी सावित्री आपल्यालाही हाच संदेश देते.
या सावित्रीकथेमध्ये त्या व्रताचेच नाव ‘वटसावित्री’ ठेवून वडाच्या झाडाचेही माहात्म्य वाढवलेले आहे.
असं म्हणतात की, वड अथवा पिंपळाचे झाड तोडण्याचा अधिकार केवळ ‘संन्याशाला किंवा ज्याचा संसार संपला आहे, वानप्रस्थाश्रमात ज्याने प्रवेश केलेला आहे’ अशांनाच आहे.
यामागचे कारण असे आहे की, अपरिहार्य झाल्याशिवाय तो झाड तोडणार नाही. कारण आतापर्यंत जगलेल्या आयुष्यामध्ये वडाच्या झाडाचे महत्त्व त्याला कळलेले असते.
या झाडाला अध्यात्मिक रूपही दिलेले आहे. वडाच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यावर जनार्दन (विष्णू) आणि अग्रावर शिवशंकर या देवता वास करतात. असा हा वटवृक्ष चिरंजीव वृक्षांपैकी मानला जातो. याच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवला तर निरोगी दीर्घायुष्य लाभते.
वड-पिंपळ व कडुलिंब या वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांना ‘त्रिवेणी’ म्हटलं जातं. वडाच्या वंशविस्तारामुळे, टिकावू व मजबूत अस्तित्वामुळे पार बांधून तेथे संध्याकाळी गप्पांचे फड बसायचे. ऋषीमुनी तपश्चर्यासाठी वटवृक्षाखालीच बसायचे. वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन निर्मिती करते. जितकी पाने जास्त तेवढी ऑेक्सिजन निर्मिती जास्त होते.
वडाची लाल फुले हे माकडांचं खाद्य आहे. पक्ष्यांनाही ती आवडतात. त्यातल्या बिया खाल्ल्याने इतरत्रही उडून नवे वटवृक्ष उत्पन्न होतात. अनेक पक्षी या

वटपोणिमा

वटपोणिमा

वृक्षावर आपली घरटी बांधतात. या पक्ष्यांची विष्ठा, वडाची पाने यांचे जमिनीवर उत्तम खत तयार होते. वडाखाली गांडुळेही असतात. त्यामुळे वडाखालची जमीन अत्यंत सुपीक बनते. खेडय़ात राहणारे शतकरी वडाच्या आसपासची माती आपल्या शेतात नेऊन मिसळतात.
वटवृक्ष हा ‘मोरेसी’ कुळातला वृक्ष. याची वेगवेगळ्या भाषेतील नावे- संस्कृतमध्ये वट, व्यग्रोध, कन्नडमध्ये आला, गुजराथीत वड, इंग्रजीत बनीयन ट्री, लॅटीनमध्ये फायकस बेंगालेन्सिस, हिंदीत बड.
वटवृक्षाची प्रत्येक पारंबी जमिनीपर्यंत जाऊन मूळ वृक्षाला आधार देते. वृक्षाचा विस्तार करते. वटवृक्ष वादळामध्ये कधीच उन्मळून पडत नाहीत.
अडय़ार नदीच्या काठचा वटवृक्ष ५०० वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. त्याचा परिसरही भरपूर व्यापलेला आहे. वटवृक्षाची फळे मार्च ते जून या काळात येतात.
बाह्य़ परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी वटवृक्ष आपले अस्तित्व टिकवतो. वाढतो. बहरतो. हा गुण माणसाने घ्यायला हवा.
वटवृक्षाच्या पानापासून पत्रावळी-द्रोण बनवले जातात. याचे लाकूड चिवट व बळकट असते. सालीपासून व पारंब्यापासून दोर बनवले जातात. चिकापासून गोंद तयार होतो. याचा रस पौष्टिक व स्तंभक असतो. सालींचा काढा मधुमेहावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस बनवून गळवांवर लावले तर गळू लवकर पिकून फुटते. औषधी रूपांमध्ये वडाचा चीक दातदुखी, संधीवात, कंबरदुखी, तळपायांवर पडणाऱ्या भेगांवर उपयुक्त आहे.
अशा या बहुमूल्य असणाऱ्या वटवृक्षाच्या फांद्या तोडून ७ जूनला रविवारी येणाऱ्या वटपौर्णिमेला वापरायच्या का? आपण स्त्रियांनीच या फांद्याची- डहाळ्यांची पूजा करायचे थांबवले तर वटवृक्षाचा संहार थांबेल. दर वर्षी या काळात होणारी वृक्षतोड बंद होईल.

साभार – लोकप्रभा

वैशाली कुलकर्णी

lokprabha.magazine@gmail.com


Comment Form

top