ज्ञानाचा महावृक्ष ! साभार- सुहास जोशी, लोकसत्ता.

6 Mar
2009

‘‘आम्हाला अशी अपेक्षा आहे, नकाशावरील अजूनही अज्ञात असणाऱ्या रिकाम्या जागा भरल्या जातील, शास्त्रज्ञांना हिमराजीतील अनोखं जैववैविध्य,

भगिरथी आणि शिवलिंग पर्वत शिखरे, गंगोत्री - गोमुख
भगिरथी आणि शिवलिंग पर्वत शिखरे, गंगोत्री – गोमुख

हिमनद्या, प्रस्तरवैभव, जनजीवनाची अधिक  माहिती मिळो, गिर्यारोहकांनी शतकानुशतके अज्ञात व अजिंक्य अशा हिमशिखरांवर साहसी आरोहण करतील म्हणूनच आज हिमालयन क्लबची स्थापना होत आहे.’’ माझे तर असे मत आहे की, अत्युच्य हिमशिखरांवर जीवनाचा आनंद कसा मिळवायचा, या अनोख्या उर्मीने जगणारी एक स्वावलंबी पिढी भारतात तयार होवो. आज ऐंशिव्या वर्षांचा टप्पा पार करताना ‘द हिमालयन क्लब’च्या पहिल्याच सेक्रेटरीने केलेले हे वक्तव्य किती सूचक होते याचे प्रत्यंतर या संस्थेच्या आजच्या वाटचालीकडे पाहताना प्रकर्षांने लक्षात येते.
१७ फेब्रुवारी १९२८ मध्ये चक्क फिल्ड मार्शल व भारतीय सैन्याचे व तत्कालीन प्रमुख सर विल्यम बर्डवूड यांच्या कार्यालयातच हिमालयन क्लबची स्थापना झाली होती. तेव्हापासून आजतागायत ‘हिमालयन क्लब’ म्हणजे जगभरातील गिर्यारोहकांसाठी सदैव एका ज्ञानवृक्षाच्या व हिमालयाच्या संदर्भातील पहिला मदतनीस म्हणून राहिला आहे. संस्थेच्या नावातच संस्थेची ध्येयधोरणं उद्बोधित होत होती. त्या काळात क्लबने भारतात आलेल्या बहुतांश गिर्यारोहण मोहिमांना संपूर्ण सहकार्य केलेले आढळले.
डोंगरात सामग्रीची वाहतूक, हिमालयाचे नकाशे, सरकारी कागदपत्रांची पूर्तता तर काही वेळा मोहीम सदस्यांना प्रत्यक्ष डोंगरात मार्गदर्शन या माध्यमातून क्लबचे काम सुरू झाले. (स्थापनेच्या वेळी तब्बल १२७ मिळालेली अशी बहुधा पहिली स्वयंसेवी संस्था असावी.) हिमालयन क्लबचे उद्दिष्ट हिमालयात मोहिमा आखणे नव्हते तर हिमालयाची साद्यंत माहिती जमा करणं आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे होते. त्यामुळेच स्थापनेच्या पहिल्याच वर्षांपासून ‘हिमालयन जर्नल’ या महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथाचे प्रकाशन क्लबतर्फे करण्यात येऊ लागले. पुढे महायुद्धाचा अपवाद वगळता या जर्नलमध्ये कधीही खंड पडलेला नाही. आजवर तब्बल ६४ जर्नल्सच्या माध्यमातून हिमालय, काराकोरम व हिंदुकुश पर्वतराजीतील असंख्य मोहिमांमध्ये दस्तऐवजीकरण यामुळे घडले. किंबहुना आज संपूर्ण जगात हिमालयातील माहितीसाठी ‘हिमालयन जर्नल’ला अतिशय मानाचे स्थान आहे. पहिलेच संपादक मेजर केनेथ मेसन यांनी तब्बल १४ वर्षे हे कार्य अतिशय मेहनतीने करून याला एक ठोस दिशा दिली. पुढे १९२७ मध्ये सोली मेहतांनी यामध्ये नवनवीन कल्पनांनी वेग दिला. तर गेली तब्बल ३५ वर्षे हरिष कपाडियांनी जर्नलना नावारूपाला आणले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात हिमालयन क्लबचे सभासद बहुतेककरून सैन्यदलं, सर्वेक्षण खाते यामधीलच होते. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र भारतीय गिर्यारोहकदेखील यात हिरीरीने सामील होऊ लागले. साठच्या दशकात क्लब बंद करावा लागतो की, काय अशी परिस्थिती असताना सोली मेहतांनी स्थानिकांच्या मदतीने यामध्ये जान आणली.
पुढे १९७१ मध्ये हिमालयन क्लबचे मुख्यालय कोलकात्याहून मुंबईला हलविण्यात आले. जगदीश नानावटींनी सेक्रेटरीपदाची सूत्रे हाती घेतली आणि पाहता पाहता क्लबने १९७८ मध्ये सुवर्ण महोत्सवी टप्पा पार केला.
आज हिमालयन क्लबचे स्वरूप एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आहे. भारतात सर्व महानगरामध्ये स्थानिक सचिव तर जगभरात स्थानिक सचिवांमार्फत उपक्रम राबविले जातात. मुंबईत महालक्ष्मी येथे क्लबचे अद्ययावत असे कार्यालय आहे. क्लबच्या न्यूजलेटर्सनी तर ऐंशीपर्यंत मजल मारली आहे. आता पर्यावरणाप्रती बांधीलकी म्हणून ईन्यूजलेटर पाठवली जात आहेत. इतरत्र संस्था आपण किती मोहिमा केल्या यावर आपले कर्तृत्व सांगताना हिमालयन क्लब मात्र स्वत: कोणतीही मोहीम न आखता आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून मोहिमेस आपले नाव वापरण्यास देतो. अशा मोहिमांची संख्या असंख्य आहे. पुस्तकांनी असे दिल्ली व मुंबई येथील ग्रंथालय, नकाशे व तसेच मोहिमांसाठी साधनसामग्रीचे भंडार या माध्यमातून या मोहिमा आजवर यशस्वी झाल्या आहेत. संगणकीय युगाची कास धरीत विविध मोहिमांचे दृक्-श्राव्य सादरीकरणांची लायब्ररी तयार केली आहे. गिर्यारोहकांसाठी शिष्यवृत्तीदेखील प्रदान केली जाते.
आज क्लबतर्फे पर्यावरणविषयक प्रश्नांवर देखील जोरदार आवाज उठविला जात आहे. अत्युच्च रणभूमी सियाचीनचे पीस पार्कमध्ये रूपांतर व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून जोरदार मोहीम उघडली आहे. आज हिमालयन क्लबचे सभासद जगभरात विखुरले आहेत. दरवर्षी भारतात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक कार्यक्रमातून येथील गिर्यारोहकांना त्यांच्याशी संवाद साधण्याचा लाभ मिळत असतो. आज ८१ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या माहितीच्या वटवृक्षाने शतकोत्तरी टप्पा गाठावा हीच आमची शुभेच्छा.

साभार – सुहास जोशी,लोकसत्ता

http://loksatta.com/daily/20090306/mv07.htm


Comment Form

top