गंगेच्या नावानं चांगभलं !

11 Nov
2008
Gomukha

Gomukha

२००८ हे वर्ष जागतिक नदीवर्ष म्हणून जगभर साजरे होत आहे. या नदीवर्षात  गंगानदीला ‘राष्ट्रीय नदी’ घोषीत करून पंतप्रधानांनी तमाम गंगा प्रेमीनां आणि भारतवासीयांना छट पूजेचा प्रसादच दिला आहे त्या बद्द्ल पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार. जगातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगेकडे पहीले जाते, भारतीयांसाठी ती केवळ नदी नाही तर देवता देखील असून श्रध्देच्या अढळ स्थानावर विराजमान झाली आहे. या नदीला ‘राष्ट्रीय नदी’ घोषीत करून पंतप्रधानांनी गंगा प्रदुषणाचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आणला आहे. मात्र ही केवळ घोषणा न ठरता गंगाप्रदुषण निवारण अभियानातील पुढचे पाऊल ठरो. गेली सत्ताविस वर्षे ‘गंगाप्राधिकरण’ गंगाप्रदुषण निवारणाचे काम करीत असुनही गंगाप्रदुषणात घट न होता वाढच झाली आहे. आता तर तिच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. या निर्णयाने गंगानदीच्या संवर्धनकार्यात सर्वसामान्याच्या सहभागाने वाढ होऊन गंगानदी पुर्विसारखी ‘निर्मळगंगा’ होओ हीच वेडी आशा. जगाच्या पाठीवर गंगे इतकी पवित्र नदी दुसरी कोणतीही नही. हजारो वर्षांपसुन कोटयांवधी भारतीयानां जीवनदान देत गंगेचा प्रवाह वाहतो आहे. गंगाजी, गंगामैया, गंगादेवी अशा आदरार्थी नावानेच आपण हरगंगेचा उल्लेख करतो. कारण, भारतीय हिंन्दु संस्कृतीचा जन्म गंगामातेच्या उदरातुनच झाला. भोजव्रुक्षाच्या सावलीत ती विकास पावली. व्यास, वशिष्ठ व वाल्मिकी सारखे द्रष्टे ॠषि मुनी व महाकवी कालीदास यांच्या प्रतिभा गंगाकिनारीच फुलल्या. त्यातुनच रामायण, महाभारत, वेदपुरणे व शाकुंतल

Bhagavan Buddha
Bhagavan Buddha

आणि मेघदुत या सारखी महकाव्ये आदी ग्रंथांची निर्मीती झाली. सम्राट चन्द्रगुप्त मोर्य,सम्राट अशोका सारखे महाप्रक्रमी राजे आणि त्यांच्या राजाधान्यां गंगाकाठी उभ्या राहील्या. गंगाकिना-यावरील बोधीव्रुक्षाखाली गौतमबुध्दानां ज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि ते भगवान बुध्द झाले. गंगाजलाच्या तंरगाशी भारतवर्षाच्या अनेक आठवणी बांधल्या गेल्या आहेत. भारताच्या जयपराजयाची साक्षीदार गंगामैयाच आहे. आपल्या विजयगीताचे तिनेच कौतुक केले तर पराजयाच्या आक्रोशात सांत्वनही तिनेच केले. आमच्या प्राचीन संस्कृतीचे आणि जीवन प्रवाहाचे प्रतिक गंगामाई आहे.  काळाच्या ओघात प्रवाह बदलत गेले प्रतिक मात्र  गंगामाईच राहीली.

छत्रपति शिवजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ‘पंचनद्यां’चे जल आणले गेल्याचा उल्लेख इतिहासात आहे. त्यात ‘गंगाजल’ अग्रस्थानि होते. सर्वच मोघल सम्राट गंगाजलच प्राशन करीत. गंगाजलच आणण्याची त्यांची वेगळी व्यवस्था असे. आजही वाराणसीचे नरेश यांच्या साठी वर्षभराचे गंगाजल गंगोत्रीहुन आणले जाते. ऐतिहासिक दस्तावेजा नुसार गंगनदीच्या उगमाचा शोध घेतला गेल्याचे अकबर बदशहाच्या शासन कालखंडात सन १५६५ ते १६०५ दरम्यान मानले जाते. त्या वेळी एक अभियानदल अत्यंत कठीण परिस्थित नैसर्गिक आपत्तिनां तोंड देत गंगानदीचे उगमस्थळ ‘गोमुखा’ पर्यंत पोहचले होते.  पुढे ईस्ट इंडिया कंपणीच्या सर्वेक्षण विभागाने सन १८१७ मध्ये सर्वे आँफ इंडियाचे

Gomukh in Summer
Gomukha in Summer

कँप्टन जाँन हाँगसन व कँप्टन हाँवर्ड हे काही साधुसंत आणि यात्रेकरु यानां बरोबर घेऊन गंगोत्रीमार्गे गोमुखा पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते. तेथे त्यांनी पाहीले की विशाल हिमगुफेतून निळभोर देवनदी गंगामैया वाह्त आहे. या विशाल हिमगुफेवर भव्य भगीरथी पर्वतांचा विशाल समुह आणि शिवलिंग पर्वत विराजमान आहेत. हरिद्वारची कावडयात्रा, इलाहाबादचा कुंभमेळा, वाराणसीची देवदिपावली, पटण्याची छटपुजा,कोलकत्याचा दुर्गा उत्सव, पश्चिम बंगाल मधील गंगासागरयात्रा हे सगळेच सांस्कृतिक  उत्सव गंगाकिना-यावर होतात. गंगातटावर सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने राहतात.

गंगोत्री ग्लेशियर हा हिमालयातील विशाल हिम पर्वतरांजीच्या दक्षिण टोकाचा एक भाग आहे. या मध्ये संतोपन्थ, भगीरथ, शिवलिंग सारखे उंच प्रमुख पर्वत आहेत. तर रक्तवर्ण, चतुरंगिनी,श्वेता, वासुकी, कीर्ति, तसेच कालिंदी हे सहाय्यक पर्वत आहेत. या हिमनगाचे क्षेत्रफळ २०० वर्ग कि.मी. आहे जो अंशताह बर्फमय प्रदेश आहे. २००० साली केलेल्या पाहणी नुसार गोमुखाची उंची ४० मीटर होती. हिमनग वैज्ञानिकांच्या मते हिमालयाचे क्षेत्रफळ हळूहळू आकुंचन पावत आहे. ग्लोबल वाँर्मिंगमुळे हिमनग वितळण्याची गती पुर्वी पेक्षा वर्तमानात वाढली आहे. लखनऊ येथील भारतीय भू-विज्ञान सर्वेक्षणाने केलेल्या पाहणीनूसार गंगोत्री हिमनग, साल १९३५ ते १९५६ या कालावधीत प्रतिवर्षी १० मीटर या

DNA News
DNA News

गतीने वितळत होता. तर साल १९५६ ते १९९० या कालावधीत हिमनग वितळण्याची गती वाढून २७ ते ३० मीटर मोजली गेली. गोमुख, गंगोत्री परिसरात होत असलेली पर्यटक, यात्रेकरु यांची वाढती गर्दी, हिमालयातील थंडीचा विचार करता मानसी दोन किलो लाकडे आंघोळीच पाणी गरम करण्यासाठी आणि जेवणासाठी प्रतिदिनी लागतात तसेच आश्रमांची होणारी वाढ त्या साठी होणारी वॄक्षतोड, तर टेहरी धरणाच्या निर्मितीसाठी एक करोड वॄक्षांची कत्तल करण्यात आली ज्या भुजपत्रावर रामायण, महाभारत, वेदपुराणे व शाकुंतल, मेघदूत या सारखी महाकाव्ये आदी ग्रंथ लिहले तो भोज वॄक्ष नष्ट होण्याचा मार्गावर आहे, आणि याउपरही परिस्थिती अशीच राहीली तर येत्या ५० वर्षात देवनदी गंगा लुप्त होइल. मात्र उत्तराखंड सरकारने या वर्षापासून सर्वसामान्य यात्रेकरू आणि पर्यटक यांच्यावर पुर्वपरवानगी शिवाय गोमुखापर्यंत जाण्यावर निर्बधं घालून गंगारक्षणाच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरवर्षी हजारो पर्वतारोही गोमुखा मार्गे कालिंदी शिखराकडे पर्वातारोहणासाठी जातात. तसेच ‘कावडयात्रॆ’ दरम्यान लाखो शिवभक्त गोमुखाला भेट देतात दरम्यान जुन्या कावडी तेथेच टाकून नवीन कावडीतून ‘गंगाजल’ घेवून जातात यामुळे होणारे प्रदुषण काही प्रमाणात कमी होईल. मात्र पर्वातारोहण हा एक खेळाचा भाग असल्यामुळे  पुर्वपरवानगीने दिवसाला १५० पर्वातारोही गूमुखाला भेट देऊन पुढे जातात. मात्र यावरही कडक निर्बधं घालुन गोमुख वाचवणे आत्यंत गरजेचे आहे. कारण गोमुखा पासुन चीनची सीमा मात्र ७० कि.मी. असल्याचे गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाच्या

Gomukha
Gomukha in Winter

अधिका-यांकडून समजले तर मानवी दुष्क्रुत्यां मुळे वर्षाला ४० मिटरपेक्षाजास्त गतीने वितळणारे गंगानदीचे उगमस्थल ‘गोमुख’ काही वर्षांतच चीनच्या सीमेपार जाईल अशी भीती त्या अधिका-यांनी व्यक्त केली. आणि त्या मुळेच भारताची ओळख असलेल्या गंगानदीला वाचवण्यासठी गोमुख बचाव अभियाना पासुनच करावी लागेल. हिमालय आणि त्याच्या एका हिमनगातून उगम पावणारी देवनदी गंगा या दोघांबद्दल स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गिय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याही मनात नितांत आदर होता. तो वारसा इंदिरा गांधींकडेही आला. निसर्ग, वन्यजीवन, पर्यावरण या विषयी त्यांना विषेश आस्था होती. गंगेचे बकालपण त्यानां खूपणे स्वाभाविकच होते. साल १९७९ मध्ये पंतप्रधानपदी येताच त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले आणि गंगानदीच्या खो-याची सर्वांगीन पाहाणी ‘केद्रिय प्रदुषण नियंत्रन मंडळा’ मार्फत हाती घेण्यात आली. त्याचे दोन सविस्तर अहवाल सादर होताच, त्या आधारे गंगनदीच्या शुध्दीकरणाची क्रुती योजना आखण्याची कार्यवाही सुरु झाली. १९८४ च्या आँक्टोबर मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निर्घुन हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधानपदावर आले.त्यांनी गंगानदी शुध्दिकरण क्रुती योजनेला आनखी गती दिली. तसेच

 Jagjitpur sewage water purification plant
Jagjitpur sewage water purification plant

केंद्रसरकारची योजना असे जहीर करुन त्यास प्राधान्य दिले. अतिशय मह्त्वाकांक्षी आणि इतर राष्ट्रापूढेही आदर्श ठेवण्याची क्षमता असणारी

गंगा क्रुती योजना अर्थात ‘गंगा अँक्शन प्लान’ हे काही केवळ राजीव गांधी यांचे स्वप्न नव्हते. धर्ममार्तडांचा आणि साधुसंताचां रोष पत्करून गंगजल शुध्दिकरणाचे काम त्यांनी जोमाने सुरू ठेवले. त्यातूनच ॠषिकेशमधील मुनी को रेतो आणि हरिद्वारमधील जगजीतपूर येथील सांडपाणी जलशुध्दीकरण प्रकल्पांची निर्मिती झाली. पूर्वी  ॠषिकेश व हरिद्वार या शहरांच सांडपाणी व मलमुत्र गंगानदीतच सोडले जात असे.  गंगाप्रदुषणाची सुरुवात ॠषिकेश व हरिद्वार या शहरांपासुनच होत होती, पण या प्रकल्पांच्या निर्मिती नंतर दोन्ही  शहरांच सांडपाणी व मलमुत्र या प्रकल्पांत जमा केले जाते, त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया होऊन केलेले पाणी पुन्हा शेतीसाठी वापरले जाते. तर या प्रकल्पांत गोबरगँस व खत याचही उत्पादन होऊ लागले. हे जलशुध्दीकरण प्रकल्प गंगा शुध्दीकरण मोहीमेतील आदर्श उदाहरण आहे.

वाराणशीतील दशाश्वमेघ घाटावर सभारंभपूर्वक सुरु करण्यात आलेला, २९३ कोटी रुपये खर्चाचा पहिला टप्पा १९८६ ते १९९३ या कालावधीत राबवून पूर्ण करण्यात आला. पण दुर्दैवाने उत्तरेतील राज्यांमधील अस्थिरता, अंमलबजावणीस लागलेली भ्रष्टाचाहाची कीड् आदीकारणांमुळे ही योजना पुढे फसतच गेली. याचे परिणाम मात्र गंभीर झाले. आज उत्तरेतील लक्षावधी लोकांना ते भोगावे लागत आहेतच, पण खुद्द गंगानदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. आज गंगेची काय अवस्था आहे? बिहारसारख्या राज्यात गंगेचे पात्र पाच-पाच किलोमीटर रुंद एवढे विशाल

Ganga at Kanpur
Ganga at Patna

आहे. पटणा जवळ तर ते सात किलोमीटर रुंद आहे. उन्हाळ्यातदेखील हिमसाठे वितळून पात्रात प्रवाह खेळत राहत असे. आज गंगेच्या खो-यात अनेक धरणे आणि वीजप्रकल्प उभे राहिल्यामुळे पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी होत गेले. उत्तर प्रदेशाच्या मानाने बिहारमध्ये पात्राचे कोरडेपण वाढत जाते. पाच-पाच, सात-सात किलोमीटर रुंदीच्या विस्तीर्ण पात्रात पाण्याचा प्रवाह एका बाजूला राहून मैलोनमैल पात्र उघडे पडते. छटपूजेसाठी भाविक नदीत उतरतात, तेव्हा हे वाळवंट आणि दलदल विशेष जाणवते. गंगा आटल्यामुळे तीच्या खो-यातील भुअतंर्गत पाण्याची पातळी खाली चालली आहे. विषेशता: बिहारमध्ये त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढू लागले आहे. उत्तरेकडून, हिमालयात उगम पावून वाहत येणा-या कोसी, कमला बालन, गंडक, बुरी गंडक आदी नद्या बिहारमध्ये गंगेला मिळतात. मात्र त्या सर्वस्वी मान्सू्नच्या पावसावर अवलंबून असतात आणि उन्हाळ्यात त्या पूर्ण कोरड्या पडतात. त्याचा परिणाम विशेषत: दक्षिण बिहार दुष्काळी होण्यात होतो. बिहारची भौगोलिक परिस्थिती अशी विचित्र आहे की, उत्तरेकडील नद्यांना पूर् येऊन ओला दुष्काळ पडतो, गावेच्या गावे पाण्याखाली जातात, शेतीचे नुकसान होते. तर दक्षिणेकडे पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, दुष्काळ-रोगराईचे संकट ओढवते ! जीवनदायिनी गंगा बिहारनध्ये अशी दोन बाजूंनी जीवघेणी ठरते. गंगेचे अस्तित्व आणखी चारच दशकांत धोक्यात

Bihar Flood

Bihar Flood

येईल, असा ‘डब्लूड्ब्लूएफ’ चा इशारा खरा ठरला तर आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात बिहारची विभागणी करणारी गंगा संपूर्ण उत्तर भारताचे चित्र पालटवून टाकेल! अर्थात ते अत्यंत भयावह चित्र असेल. दक्षिण बिहारमधील ४७ लाख हेक्टर जमिनीपैकी वीस लाख हेक्टर जमीन जलसिंचन योजनांच्या लाभापासून अजूनही वंचित आहे. गंगेलगतच्या गावांना गंगे लगतच्या  गावानां आणि शेतजमीनीला पुर्वी पाणीटंचाई जाणवत नसे. मात्र गेल्या पन्नास वर्षात गंगेचे पात्र आक्रसत गेल्याचे तेथील रहीवासी सांगतात आणि तेच वाढत्या पाणीटंचाईचे कारण आहे. दक्षिण बिहारमधील शेती आणि लोकजीवनही यापुढील काळात अधिक होरपळणे अटळ आहे. या वर्षी ‘बिहारचे अश्रू’ म्हणूनच ओळखली जाणा-या कोसीनदीच्या प्रवाहात सत्तर वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने उत्तर बिहारमध्ये हाहाकार माजला होता. एंकदरीत पंधरा जिल्हातील ३० लाखांहून जास्त लोकांना या महाभयंकर पूराचा तडाख बसला आहे. मधेपूरा, सहरसा, आरारिया हे जिल्हे तर अक्षरश: जलमय झाले होते. यामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले आहेच पण अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे तेथील जनजीवन आजही पुर्वस्थितीवर आलेले नाही. बिहार मधील सालाबाद पूरस्थितीला फराक्का बांध तर कारणीभूत नाही ना? याचा आढावा केंद्रसरकारने पुनश्च घ्यावा. (फराक्का बांधावरील विश्लेशणयुक्त विमोचन ज्युलियन हाँलिक यांच्या ‘गंगा’ या पुस्तकात वाचायला मिळते. प्रकाशक- अमेया प्रकाशन, मराठी अनुवाद-प्रकाश अकोलकर).

बिहारची अशी अवस्था; म्हणून उत्तर प्रदेशात आलबेल असेल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. मात्र तेथील स्वरुप वेगळे आहे. कानपूर,

Drainage in the Ganga at Kanpur
Drainage in the Ganga at Kanpur

मिर्झापूर्, अलाहाबादसारखी ४८ शहरे गंगेच्या वसलेली आहेत. यापैकी लाखाच्या संख्येत लोकवस्ती असलेल्या २९ शहरांचे सर्व सांडपाणी वेगळ्या ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प पूर्वीच हाती घ्यायला हवे होते. गंगा कॄती योजनेच्या पहिल्या टप्प्याची आखणी करताना, गंगेकाठच्या ११४ मोठ्या गावांमधून दररोज एक अब्ज चाळीस कोटी लिटर सांडपाणी गंगेत सोडले जाते, असा अंदाज करण्यात आला होता. पण २५ वर्षांत ही स्थिती किती भयावह झाली आहे, यासाठी एकट्या वाराणशीचे उदाहरण पुरेसे ठरावे. केवळ वाराणशीतून दररोज दोन अब्ज लिटर सांडपाणी गंगेत सोडले जाते. कानपूर मध्ये शेकडो चर्मोद्योग आहेत,तसेच वाराणशीत रंगीत साड्यांच्या गिरण्या आणि मिर्झापूरमध्ये गालिच्यांचे कारखाने आहेत. कानपूरचे १५० चर्मोद्योग वाराणशीचे ४० साडी प्रिंटींग प्रकल्प, मिर्झापूरचे १० कार्पेट-डाइंग यूनिटस प्रदूषण नियंत्रणाचे काहीही नियम न पाळता, प्रकॄतीस हानिकारक असे रासायनिक दूषित पाणी गंगेत सोडतात.

गंगेला ‘माता’ मानले जाते. मरणोउपरांत आपला पार्थिवदेह ‘गंगार्पण’ व्हावा, असे मानणारे हज्जारो लोक आहेत. गंगेकाठी अंतविधी पुर्ण न करताच अर्धवट जळालेले पार्थिव देह आजही मोठया प्रमाणात गंगानदीच्या प्रवाहात सोडून दिले जातात. केवळ वाराणसीमध्ये दरवर्षी ४००० हून जास्त मानवी पार्थिवदेहांच गंगानदीच्या प्रवाहात विसर्जन केले जाते जनावरांच्या पार्थिवा बाबत न बोललेले बरे ! अगदी अस्थि विसर्जनासाठी देखील प्राधान्य दिले जाते ते गंगेलाच.

Bone Abanbonment at Allahabad
Bone Abandonment at Allahabad

गंगेचे प्रदुषण एवढयावरच थांबत नाही. कोलकोत्याला प्रसिध्द हावडा ब्रिज खालिल परिसरात गंगा किना-यावरील घाण पहावत नाही. नवरात्री नंतर होणारे दुर्गाविसर्जन कशा आवस्थेत होते हे तर सर्वज्ञात आहे. कालीघाटावर नावाप्रमाणे काळेभोर झालेल्या ‘गंगाजलाने’ आचमन केल्याशिवाय भक्त कालीमातेच्या मदिंरात जात नाहीत. गंगातटावर असलेल्या बेल्लुरमठातील प्रसन्न वातावरण, तिथली स्वच्छता, शांतता यामुळे मनात पावित्र्य निर्माण होते. मात्र मठाच्या मागील बाजुस गंगकिना-याकडे गेल्यास, नागरी वस्त्यांच्या सांडपाण्याचा एक मोठा नाला ‘गंगाजल’ ब-यापैकी दुषीत करताना दिसतो. एका तटावर बेल्लुरमठ तर पैलतटावर दक्षिणेश्वर हे कालीमातेच प्रसिध्द आणि बंगाली बांधवानां पवित्र असणारे मदिंर आहे. याच ठिकाणी रामक्रुष्ण परमहंसाना कालीमातेन साक्षात्कार दिल्याच मानल जाते.मदिंरातील स्वच्छता खुप चांगली आहे. मठातील, मदिंरातील स्वच्छता तर गंगतटावरील अस्वच्छता य मुळे मनातील गोंधळ गंगाप्रदुषणा सारखा वाढतच जातो. पश्चिम बंगाल मध्ये ४५ कारखाने गंगातटावर आहेत. हे कारखाने चालवण्यासठी ‘गंगाजलच’ वापरले जाते तर वापरलेले टाकवू रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही शुध्दिकरणाची प्रक्रिया न करताच गंगानदीच्या पात्रात सोडले जाते. पुढे गंगासागरला जाणा-या ‘गंगाजलात’ मानवी

Gangajal at kolkata
Gangajal at kolkata

शरीराला घातक ठरणारे रसायण, मलमुत्र सांडपाण्याच्या स्वरुपात मिसळते. प्रतिवर्षी १४ जानेवारीला होणा-या ‘गंगासागर’ यात्रेहून लाखो यात्रेकरुद्वारा आनले जाणा-या ‘गंगाजल’ प्राशनाने खरोखरच ‘मोक्ष’ मिळेल का ?

आम्हा भारतियांच्या मनात गंगेच नेमक स्थान आहे तरी काय ? हिमालयाच्या डोंगरद-या पार करून थेट पश्चिम बंगालच्या सागरबेटांपाशी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी ही महानदी. या नदीच्या दर्शनाने कोटयांवधी भारतीयांचे हात आपोअपच जोडले जातात आणि ‘गंगाजल’ म्हणजे साक्षात अम्रुत.‘गंगास्नान’ आणि ‘गंगाजल’ प्राशन या दुहेरी योगा नंतर स्वर्गाची द्वारे आपल्यासठी हमखास उघडतात अशी मनापसून श्रध्दा असलेले आम्ही भारतीय या महानदीचा इतक -हास कसा काय करू शकतो ?

आणखी उशिर होण्यापुर्वी या नदीला स्वास घेण्याची फुरसत द्यायला हवी. त्या साठी संघटित लोकशक्तिचा दबाव आणुन राजकिय इच्छाशक्ति या प्रश्नाकडे वळवणे, हाच गंगानदीला वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. गंगमाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हाती आहे हे मात्र खर !

Gangajal at Varanasi
Gangajal at Varanasi

शंभर करोड पेक्षा जास्त लोकसंखेच्या या भारतात किती लोक गंगा शुध्दीकरणाच्या किंवा गंगानदीला वाचवण्याच्या विरोधात असतील? कोणताही पक्ष, कोणतीही संघटना किंवा सर्वसामान्यांपैकी कोणी विरोधक असणं शक्यच नाही. असे असताना बहुमताच्या मुद्दावर ही समस्या कधीच सुटायला पाहिजे होती पण तसं झाले नाही ही वास्तूस्थिती आहे. याला कारण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या बरोबरच, आम्ही काय करणार? हे सरकारचे काम आहे असे म्हणत सगळी जबाबदारी झटकून टाकायची ही भूमिकाच गंगानदीच्या -हासाला कारणीभूत ठरत आहे. आता गरज आहे प्रतेक भारतीयांनी भागिरथ होण्याची, गंगामैयाच्या संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलण्याची. सेतूसमुद्रम, रामजन्मभूमी, बाबाअमरनाथ अशा अनेक मुद्दावर केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनाआंदोलन आयोजली जात्तात अन् ती यशस्वीही होत्तात. मग हिंन्दू  संस्कृतीची जननी, समस्त भारतीयांची जीवनरेखा आणि श्रध्देच्या अढळ स्थानावर विराजमान असलेली मोक्षदाईनी गंगामैया हीच्या संवर्धनासाठी,  केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनाआंदोलनांच आयोजन का होत नाही ?  गंगानदीच्या खो-यातून ८४ खासदार लोकसभेवर जातात. याच प्रमाणे आमदार किती ? नगरसेवक किती ?  तर जिल्हापरिषद व  ग्रामपंचायत पातळीवरचे लोकप्रतिनीधी  किती ?  तसेच सर्वसामान्य  या सगळयांनी जागे होण्याची  वेळ आजून आली नाही  का ?

Sacred Confluence of river Ganga and Yamuna at Allahabad
Sacred Confluence of river Ganga and Yamuna at Allahabad

या बरोबरच ज्या राज्यांतून गंगानदी वहात नाही, त्यांनी ही समस्या आपली नाही असे समजण्याच मुळीच कारण नाही. गंगानदीच्या पूरामुळे अथवा तिच्या प्रदुषणाचे परिणाम हे दुरगामी आणि सर्वत्रिक आहेत. कोलकोता, दिल्ली, मुंबई या मेट्रो शहरांवर, गंगानदीच्या दुष:परिणामांना कंटाळलेल्या परप्रांतीयांचा भार वाढतोच आहे शिवाय हा भार भविष्यात इतर राज्यांतील शहरांवर येणार नाही का ? जागो भारतवासी जागो ! अन्यथा गंगनदी शिवाय भारत म्हणजे विनाश ! विनाश ! आणि विनाशच !

विजय् मुडशिंगीकर
अध्यक्ष, गंगजल नेचर फौंडेशन, मुंबई (रजि.)

Comment Form

top