मी मुंबईकर

15 Sep
2008

पर्यावरणाच्या बाबत आपण किती जागरूक आहोत ? या संदर्भात दोन उदाहरणे देता येतील. २१ मार्च हा दिवस जगभर ‘World Forest Day’ अर्थात ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच्या औचित्याने जंगलांचे संवर्धन व्हावे म्हणून वॄक्षारोपणासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.शाळा व महाविद्यालयामध्ये परिसंवाद व व्याख्याने यातून विद्यार्थ्यानां प्रबोधनपर मार्गदर्शन केले जाते. पण आपल्याकडे मात्र चित्र वेगळेच असते, या वर्षी २१ मार्च या ‘जागतिक वन’ दिनाच्याच दिवशी होळी हा सण आपण साजरा केला. जगभर जंगलाच्या संवर्धनावर चिंतन होत होते तर आम्ही मात्र संस्कृतीच्या पडदया आडून लाखो टन लाकडांची राख करत होतो.त्याच्या दुस-याच दिवशी २२ मार्च रोजी होता ‘World Water Day’ अर्थात ‘जागतिक जल दिवस’ या दिवशी ‘जल हेच जीवन आहे’, ‘मिळून सारे जन, करू पाणी जतन’ हा संदेश अक्षरश: पायदळी तुडवला. धूलिवंदनानिमित्त रंगपंचमी साजरी करण्यासाठी हजारो लीटर पाण्याचा वापर रंग तयार करण्यासाठी तर वापरलेला रंग धुवून काढण्यासाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. या वेळी मुंबई पासून दूर खेडयापाडयातील स्र्त्रिया पाण्यासाठी मैलोनमैल वनवन करतात याची आठवण आम्हाला झाली नाही.

‘मी मुंबईकर’ म्हणुन मिरवणा-या कितीजणांना मुंबई हे शहर जगातील सातवे गलिच्छ शहर असल्याचे माहित आहे? आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई, विश्वविख्यात Bollywood मुंबईत, शेअर मार्केटचे केंद्र मुंबई, देशभरातील कोणतीही महानगरपालिका जमा करून देत नसेल इतका महसुल मुंबई महानगरपालिका जमा करून सरकारला देते. या मुंबईची चिंता सरकार पासून राज्यकर्त्यां पर्यंत कोणालाही असल्याचे जाणवत नाही हेच खरे. जगभरात मुंबई शहराचे आकर्षण आहे आणि त्यामुळेच या महानगरपालिकेच्या महापौरांनाही मान आहे. मुंबईच्या समुद्रात गणेशमुर्तींचे विसर्जन करु नये असे स्पष्ट मत मांडून महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पर्यावरणाच्या संदर्भात ठोस पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नाही हेच सांगितले आहे. धर्म, संस्कॢती या बरोबरच निसर्गाचा समतोलही राखला पाहिजे अन्यथा: निसर्गाच्या क्रोधात धर्म, संस्कॢती बरोबरच मानवी जीवन ही नष्ट होण्यास सेकंद पुरेसा आहे. याची प्रचिती २६ जुलै तसेच सुनामी दरम्यान आलेली असूनही आपण त्यातून काही बोध घेत नाही यातच आपली शेखचिल्ली वॄत्ती दिसून येते.  महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मांडलेल्या मुद्दयाच्या संदर्भात विचार करण्या ऐवजी ते महापौरांचे व्यक्तिगत मत असल्याचा सूर आळवणे निश्चितच खेदजनक आहे. राज्यकर्त्यांच्या मृगजळी भाषणात न अडकता समस्त मुंबईकरांनी पर्यावरणवादी महापौर डॉ.शुभा राऊळ यांच्या मुद्दयाचा सारासार विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.


Comment Form

top